Join us

Cotton Market : खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची शेतऱ्यांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 11:05 AM

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 'एनसीसीएफ'च्या वतीने कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सहा कापूस खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. (Cotton Market)

 Cotton Market :

नांदेड : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 'एनसीसीएफ'च्या वतीने कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सहा कापूस खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

परंतु दसऱ्याचा मुहूर्त गेल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर तरी कापसाची खरेदी सुरू होईल, असे वाटत असताना दिवाळीलाही पांढऱ्या सोन्याची खरेदी झालीच नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.

केंद्र शासनाने या हंगामासाठी सर्वच खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. त्यात कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार १२१ ते ७ हजार ५२१ याप्रमाणे भाव जाहीर केला आहे.

जिल्ह्यात हमीभावाने कापूस खरेदीसाठी भोकर, धर्माबाद, हदगाव, कुंटूर, नांदेड व नायगाव ही सहा केंद्र सुरू केली आहेत; परंतु दसऱ्यानंतर दिवाळीचा सण गेला तरी अद्यापही कापसाची हमीभावाने खरेदी केलेली नाही; पण अनेक ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे.

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीसाठी १३ खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, मूग, उडिदासाठी एकही शेतकरी पुढे आला नाही. कापसाचे केंद्र सुरू केले नसल्याने कापसाचे भाव पडण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे.

'सीसीआय'चे सहा खरेदी केंद्र

जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केलेली असली तरी यावर्षी 'सीसीआय' मार्फत केवळ सहा खरेदी केंद्रच सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये भोकर, धर्माबाद, हदगाव, कुंटूर, नांदेड व नायगाव या केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय खासगी व्यापाऱ्यांकडून अनेक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले असून, तेथे खरेदीही केली जात आहे; पण सध्यातरी कापसाला ६ ते ७ हजारांच्या आत भाव मिळत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डनांदेड