Cotton Market :
बीड : कॉटन कार्पोरेशनकडून पांढऱ्या सोन्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. सीसीआयने कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती शेतकऱ्यांना देत आहे. जेणे करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यास मदत होईल.
सीसीआयकडून बीड येथील हनुमान नगर येथे सिद्धी जिनिंग अँड प्रेसिंग केंद्रावर येथे कापूस खरेदी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर हमीभावाने कापूस विक्री करून नुकसान टाळण्याचे आवाहन बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केले. शेतकऱ्यांनी अधिक चौकशीसाठी बाजार समितीचे सीसीआय कडील कर्मचारी टेकाळे यांना संपर्क करण्याचे कळविले आहे.
कापूस विक्री करण्याआधी शेतकऱ्यांनी 'हे' करावे
* कापूस केंद्रावर थेट कापूस घेऊन न येता २०२४-२५ चा कापूस पीक पेरा नोंदीचा डिजिटल सातबारा व आधार कार्ड घेऊन नोंदणी करून घ्यावी. शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशीदेखील सीसीआय कापूस केंद्रावर सीसीआयचे कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करता येईल. नोंदणी करताना ज्याच्या नावे सातबारा असेल तो शेतकरी अथवा त्याच्या रक्तातील नातेवाईक हजर असणे अत्यंत अनिवार्य आहे.
* कापूस पहिल्या वेचणीचा ओला (थप्पीचा माल) असेल तर एक दिवस २ आगोदर मोकळा करून दुसऱ्या दिवशी वाहनात भरावा जेणे करून त्यातील ओलावा निघून जाईल व चांगला भाव मिळेल, तसेच कापूस भरताना नकट्या, कवड्या, कचरा येणार नाही, स्वच्छ माल असेल, याची काळजी घ्यावी, खराब माल असेल तर तो सीसीआयकडून परत पाठवला जाऊ शकतो.
* शेतकऱ्याने वाहनात माल भरताना गोणी, बोन्द्री पोते, भोत, गाठोडे आदीमध्ये कापूस घेऊन न येता वाहनात मोकळा कापूस भरून घेऊन यावा.
* कापूस खरेदी ही शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पर्यंतच चालू राहील. याची कापूस शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.