मुक्ताईनगर : दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. केंद्राचे हमीभाव ७ हजारांवर असल्यावरसुद्धा कापसाच्या खासगी बाजारपेठेत ६८०० ते ७ हजार भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे.
नैसर्गिक आपत्तीनंतर उरलेल्या कापसाला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. दसऱ्यापासूनच बाजारात बागायती कापूस दाखल झाला. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे कापसाचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतातून येईल तसा कापूस साठविण्याऐवजी थेट बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहे. त्याचा फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दर कमी दिला जात आहे.
हमीभाव पेक्षा कमी भाव...
• केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली आहे. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपय हमीभाव जाहीर केला आहे.
• कापसाच्या खासगी बाजारपेठेत ६, ८०० ते ७ हजाराचे दर मिळत आहे. हे दर हमीभाव पेक्षा कमी आहेत.
पाचशे क्विंटलची आवक
• दिवाळी व भाऊबीजेच्या औचित्याने बाजारात कापसाची आवक काहीशी वाढली आहे. शेतकरी शेतात कापसाचा वेचा होताच कापूस थेट बाजारात आणत आहेत. कापसाच्या बाजारपेठेत दररोज सुमारे ५०० क्विंटल कापसाची आवक होत आहे.
• बाजारात आवक वाढल्यामुळे कापसाच्या दरातही घट आली आहे.
कापूस खरेदी केंद्र सुरू करा
• शासन काही खरेदी केंद्र वेळेवर सुरू करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाचशे ते सातशे रुपये प्रतिक्विंटल फटका बसत आहे.
• शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
हेही वाचा : Honey Health Benefits : मधाळ मधाचे आरोग्यदायी फायदे