मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गुरुवारी झालेल्या लिलावात कापसाला कापसाला वरचा दर ८ हजार ५० रुपये मिळाला. यंदाच्या हंगामात सात महिन्याच्या कालावधीत तिसऱ्यांदा कापसाचे दर आठ हजारावर गेले आहेत. शेतकऱ्याकडील कापूस संपल्यानंतर बाजार भावात तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात १४ नोव्हेंबरपासून लिलावाद्वारे कापसाच्या खरेदी - विक्रीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी कापसाला सरासरी सात हजार चारशे रुपये दर मिळाला. कापसाच्या दरात १०० ते १५० रुपयाची घसरण दिसून आली. पूर्ण डिसेंबर महिन्यात सात हजार ५० ते सात हजारपर्यंत भाव मिळाला.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर ६ हजार ८०० रुपयापर्यंत भाव खाली आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात भावाची स्थिती जैसे थे दिसून आली. तर उर्वरित १३ दिवसात कापसाच्या भावात तेजी दिसून आली. २९ फेब्रुवारीला सात हजार ७०० वर भाव पोहोचले.
७ मार्च ते १३ मार्च दरम्यान कापसाच्या भाव आठ हजारावर गेले. १३ मार्च दरम्यान कापसाचे भाव पुन्हा २०० ते ३०० रुपयांनी उतरले. मात्र, दोन एप्रिलपासून पुन्हा कापसाचे भाव आठ हजारावर गेले. २ एप्रिलला कापसाला सरासरी आठ हजार पन्नास रुपये दर मिळाला होता. ३ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान कापसाला सरासरी सात हजार ८०० ते सात हजार ९०० रुपये दर मिळाला.
मात्र, पुन्हा बाजार भावात घसरण झाल्याचे दिसून आले. १ ते ११ मे दरम्यान सात हजार ४५० ते सात हजार ५५० रुपये दर मिळत असल्याचे चित्र कापूस बाजारपेठेत दिसून येत होते. मात्र, २६ जूनपासून कापसाचे दर आठ हजारावर गेल्याचे दिसून आले. २८ जूनला कापसाला ८ हजारवरचा दर मिळाला. शेतकऱ्यांकडचा कापूस संपल्यानंतर बाजारपेठेत कापसाचे भाव वाढत असल्याचे चित्र आहे.
पूर्ण हंगामात तीनदा कापूस गेला आठ हजारावर
• नोव्हेंबरपासून यावर्षीच्या कापूस हंगामाला सुरुवात झाली. या हंगामात कापसाचे दर सात ते १३ मार्चदरम्यान आठ हजारावर गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. यानंतर पुन्हा कापसाच्या भावात घसरगुंडी दिसून आली. यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा कापसाचे दर आठ हजारावर गेले.
• मात्र, पुन्हा कापसाचे बाजारभाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी उतरण्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले होते. मात्र, २६ जून ते २८ जून दरम्यान पुन्हा कापसाला आठ हजारांवर दर मिळाला. संपूर्ण हंगामात तिसऱ्यांदा कापूस आठ हजारांवर गेला आहे.
नवा उगवला तरी जुन्या कापसाची विक्री सुरूच
• यंदाच्या खरीप हंगामात पेरणी झालेल्या कापसाचे उगवण झाल्याचे चित्र शेत शिवारात दिसून येत असल्याचे चित्र आहे.
• दुसरीकडे गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस पावसाळ्याचा जून महिना संपत आला तरी शेतकरी लिलावाद्वारे कापूस विक्री करत असल्याचे चित्र मार्केट यार्डत दिसून येत आहे.
मागील दहा दिवसांतील कापसाचे सरासरी दर (रु.)
१८ जून - ७५४०
१९ जून - ७५००
२० जून - ७६००
२१ जून - ७६५०
२२ जून - ७६००
२४ जून - ७७५०
२५ जून - ७९००
२६ जून - ७९७५
२७ जून - ८०५०
२८ जून - ७९५०
शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडेच ओढा
• गतवर्षीच्या हंगामात कापसाला कमी भाव मिळाला असला तरी ठोक उत्पन्न म्हणून शेतकऱ्यांनी याही वर्षी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवडीकडे ओढा वाढवला आहे.
• खर्च जास्त झाला तरी भाव चांगला मिळेल या आशेवरही कापसाची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. यावार्षी भाव वाढण्याची शक्यता आहे.