नवीन खरीप हंगामातील कापूसबाजारात येण्यास सुरुवात झाली नसली तरी विदर्भात काही ठिकाणी २०२३ मधील कापसाला सात हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. सरकी व सरकी ढेपने यंदा उच्चांक गाठला आहे. सरकीचे दर चार हजार ३००, तर सरकी ढेप चार हजारांच्या वर गेली आहे.
कापसाची गठाणही ६० हजारांवर पोहोचली आहे. यंदा पाऊस चांगला आहे. कापसाचे उत्पादनही चांगले होणार असल्याने कापसाला खुल्या बाजारात साधारणतः सात हजार ५०० रुपये दर राहील, असा अंदाज आहे.
२०२३ च्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस कमी आणल्याने केवळ एक लाख ८० हजार गाठींची निर्मिती झाली. वास्तविक दोन लाख गाठी निमिर्तीचे उद्दिष्ट जिनिंग उद्योजकांनी ठेवले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेने कापूस विकला नाही. काहींनी बाहेरच्या व्यापाऱ्यांना कापूस विकला.
यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील जिनिंग चालकांना पुरेसा कापूस मिळाला नाही, यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे उत्पादन अधिक होईल. किमान दोन लाख गाठींची निर्मिती होईल, असा अंदाज आहे. कापसाच्या उत्पादनात २०२३ मध्ये कमी पावसामुळे ३० से ४० टक्के घट झाली होती. त्यातही अतिवृष्टीने कापसाचा दर्जा घसरला. सुरुवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत दर मिळाला. नंतर मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरून मागणी कमी झाल्याने कापसाचा दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत खाली आला होता.
डिसेंबर २०२३ मध्ये 'सीसीआय'ने कापूस खरेदी काही केंद्रावर सुरू केली असली तरी सातबाऱ्यावर नोंद, पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्डची अट, सोबतच पेमेंट मिळण्यास उशीर आदी कारणांनी काही शेतकऱ्यांनी 'सीसीआय' केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते.
ज्या शेतकऱ्याला गरज होती, त्यांनीच व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस विकला, व्यापाऱ्यांनी कापसाचा दर्जा पाहून पाच हजार ते सहा हजार ८०० रुपये दर दिला होता. यंदा परिस्थिती बदलेली दिसेल असा अंदाज आहे.
सरकीचे दर घसरले तर कापसाचे दर कमी होणार
■ कापसाचे दर निश्चित करताना जागतिक बाजारात कापसाला मिळणाऱ्या दरावरही स्थानिक बाजारपेठेतील कापसाचे दर विसंबून असतात. यामध्ये सरकीचे दर कमी अधिक झाले तर त्याचा परिणामही कापसाच्या दरावर होतो. यावर्षी तीन हजार ते साडेतीन हजार रुपये क्विंटल दराने सरकी विकल्या जात आहे. यापासून ढेप तयार होते.
■ पशुखाद्य म्हणून याचा वापर होतो. सरकीच्या दरामध्ये घसरण झाली तर कापूस साडेसात हजारांच्या खाली येण्याचा धोका आहे. अशावेळी कापसाचे हमी केंद्र असेल तरच शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे. यासाठी कापूस बाजारपेठेत येण्यापूर्वी हमी केंद्र उघडण्याची नितांत आवश्यकता आहे.
गतवर्षी कापसाअभावी केवळ एक लाख ८० हजार गाठींचे उत्पादन झाले होते. चांगल्या कापसाला सहा हजार आठशे रुपये दर होता. कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी राहील, त्यामुळे व्यापारी कापसाला सात हजार ते सात हजार पाचशेचा दर देतील, असे आजचे चित्र आहे, - अहेफाज गोवेरी, संचालक, अहेफाज कॉटन प्रोसेसर.