Join us

Cotton Market : मानवत बाजारात 'इतके' लाख क्विंटल कापूस खरेदी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:41 IST

Cotton Market : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात ३० जानेवारीपर्यंत ४ लाख ७३ हजार १४८ क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद झाली आहे. त्या तुलनेत गेल्यावर्षी जानेवारी अखेर आवक कमी झाली होती. यंदा किती पटीने वाढली ते वाचा सविस्तर

मानवत : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) छत्रपती शिवाजी महाराज यार्डात ३० जानेवारीपर्यंत ४ लाख ७३ हजार १४८ क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी जानेवारी अखेर २ लाख २१ हजार १७३ क्विंटल आवक झाली होती.

या तुलनेत यंदा जानेवारी अखेर दुपटीने आवक वाढल्याचे बाजार समितीकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात कापसाचे भाव हमीभावापेक्षा ४०० रुपयांनी कमी असल्याने शेतकरी आपला कापूस 'सीसीआय'ला (CCI) विक्री करण्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे.

तर खासगी बाजार पेठेत भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) घरात कापूस ठेवण्यापेक्षा विक्री केलेला बरा अशी मानसिकता केल्याचे दिसून येत आहे. सद्यः स्थितीत खासगी जिनिंगवर चांगल्या कापसाचे दर ७ हजार १७० रुपये सरासरी दर मिळत आहे. तर कापसात ओलावा, असलेला कापूस किंवा कमी दर्जाच्या कापसास ६ हजार ८०० रुपयांपासून भाव मिळत आहे.

'सीसीआय'च्या कापूस खरेदी केंद्रांवर चांगल्या कापसाला ७ हजार ५२५ रुपये प्रतिक्विंटल वरचा भाव मिळत असून खाली ७ हजार १७५ पर्यंत भाव मिळत आहे. दरम्यान, सीसीआयकडून १० फेब्रुवारीपासून पूर्ववत खरेदी सुरू करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला कापूस परस्पर विक्री न करता लिलावाद्वारे विक्री करावा, असे आवाहन सभापती पंकज आंबेगावकर यांनी केले.

'सीसीआय'कडे वाढला कल

बाजारपेठेत कापसाचे दर हमीभावापेक्षा तीनशे ते चारशे रुपये अधिक मिळत असल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत. ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांनी ३ लाख ५ हजार क्विंटल कापूस सीसीआयला विक्री केला आहे. तर एक लाख ६७ हजार क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांना विक्री केला आहे.

अटी-शर्तीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजी

११ नोव्हेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापसाचा लिलाव सुरू झाला. शासनाच्या खरेदी केंद्रावर आवक भरपूर असली तरी अटी व शर्ती लावून कागदपत्रांची कटकट करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

... खरेदी बंद

* सीसीआय सोबत करार केलेल्या जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची खरेदी झाली असून कापूस खाली करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने सीसीआयकडून ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली आहे.

* दहा फेब्रुवारीपासून सीसीआयकडून कापसाची २ पूर्ववत खरेदी सुरू करणार आहे.

सीसीआयने मागील दहा दिवसात केलेली कापूस खरेदी (क्विंटल मध्ये)

२० जाने७६१४
२१ जाने५१९५
२२ जाने६५७५
२३ जाने६०१८
२४ जाने८०२५
२७ जाने९३२३
२८ जाने९०८२
२९ जाने८८८२
३० जाने१०१३२
३१ जाने११७९१

८ हजार भाववाढ नसल्याने निराशा

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातून आर्थिक फायदा होईल अशी आशा व्यक्त होत होती. मात्र जानेवारी उलटला तरीही कापसाने आठ हजारांचा टप्पा ओलांडला नसल्याने शेतकऱ्यांची भाव वाढीची आशा फोल ठरल्याची स्थिती दिसून येत आहे.

हिंगोलीत आजपासून कापूस खरेदी

शहराजवळील लिंबाळा (मक्ता) भागातील सीसीआयच्या केंद्रावर जागेअभावी ३ फेब्रुवारीपासून कापूस खरेदी तात्पुरती बंद होती. अखेर या ठिकाणचा जागेचा प्रश्न सुटला असून, गुरूवारी (६ फेब्रुवारी)पासून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे.

सीसीआयच्या केंद्रावर प्रारंभी ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी झाली. खुल्या बाजारात ५ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपयांनी कापसाची खरेदी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्री केला.

या केंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक आवक झाल्याने २ ते ३ वेळा जागेअभावी तात्पुरती खरेदी बंद ठेवावी लागली. यावेळेस ३ फेब्रुवारीपासून खरेदी बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारपासून पुन्हा खरेदीला प्रारंभ झाला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Procurement: सोयाबीन खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा; पोर्टल सुरू असेपर्यंत खरेदी! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड