'सीसीआय'ने (CCI) जागेअभावी कापूस खरेदी बंद केली होती. मागील दहा दिवसांपासून बंद असलेल्या या कापूस खरेदीला सोमवारी (१० जानेवारी) पासून पुन्हा प्रारंभ करण्यात आला.
आतापर्यंत १५ कापूस (Cotton) संकलन केंद्रांवर यवतमाळ जिल्ह्यातील १२ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. आणखी इतकाच कापूस या संकलन केंद्रांवर येण्याची शक्यता आहे.
खुल्या बाजारात कापसाचा दर घसरल्याने हमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या 'सीसीआय'च्या केंद्रांकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली होती. या केंद्रांवर अचानक गर्दी वाढल्याने कापूस संकलन केंद्रांची क्षमता संपली होती.
अनेक ठिकाणी कापूस ठेवण्यासाठी आणि कापसाचे जिनिंग करण्यासाठी जागा नव्हती. यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाची आवक रोखण्यासाठी 'सीसीआय'ने १० फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबविली होती. सोमवारी ही कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली.
गर्दी वाढल्याने संकलन केंद्र दहा दिवसांपासून होते बंद
२५ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी होण्याचा अंदाज आहे. यातील निम्मा कापूस अद्यापही विक्री होणे बाकी आहे.
अजून ४० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात
* हमी केंद्रातील दरापेक्षा अधिक दरात कापसाची खरेदी होईल म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाहीजे त्या प्रमाणात कापूस विकला नाही. जिल्ह्यात दरवर्षी २४ ते २६ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते.
* सीसीआयने १२ लाख क्विंटलची खरेदी केली आहे. आणखी ४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हा कापूस बाजारात येणार आहे.
'वेट ॲण्ड वॉच'
* गेल्या दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खासगी विक्रेत्यांकडे जाण्याचे प्रमाण नगण्य होते.
* खुल्या बाजारात कापसाचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती. यामुळे गेल्या दहा दिवसांत मोजकाच कापूस खासगी व्यापाऱ्यांना खरेदी करता आला. यातून गेल्या दहा दिवसांत कापूस खरेदीत मंदी दिसून आली.
अशी झाली कापसाची खरेदी
जिल्ह्यात ७ हजार ४२१ रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी 'सीसीआय'ने केली. या सर्वच केंद्रांवर यावर्षी गर्दी राहिली.
आतापर्यंत आर्णी ६५ हजार ७७८, दारव्हा ८१ हजार ७४८, घाटंजी एक लाख ६३ हजार ५९३, कळंब २४ हजार ४०४, खैरी ७२ हजार ५२३, महागाव ३७ हजार ३३, मुकुटबन ७३ हजार ९१४, मारेगाव ७८ हजार ८०७, पांढरकवडा एक लाख ५३ हजार ३९५, पुसद ४९ हजार ८१९, राळेगाव ८३ हजार ५६३, सिंदोला ५३ हजार ३०५, वणी दोन लाख ५२ हजार ६६५, यवतमाळ ७४ हजार २३३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
दोन दिवसात खरेदी पुन्हा सुरू होणार!
वाशिम जिल्ह्यात अनसिंग आणि मंगरुळपीर येथील केंद्रात 'सीसीआय'कडून कापसाची खरेदी होत आहे. तथापि, मागील काही दिवसांत वाढलेली आवक आणि साठवुणकीची अडचण उद्भवल्याने खरेदी तूर्तास थांबली आहे.
येत्या दोन दिवसांतच ही खरेदी पुन्हा सुरू होणार असल्याचे 'सीसीआय'च्या केंद्र संचालकांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात अनसिंग आणि मंगरुळपीर या दोन ठिकाणच्या केंद्रात सीसीआयकडून कापसाची खरेदी केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कापूस उत्पादक या केंद्रात कापूस आणत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी केंद्रात कापसाची आवक वाढली होती. परिणामी, जिनिंग, प्रेसिंगमध्ये कापूस मोठ्या प्रमाणात वाढला आणि कापसाची खरेदी थांबवावी लागली.
या दोन्ही केंद्रांमध्ये मिळून जवळपास १ लाख २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सद्यस्थितीत खरेदी थांबली असली तरी येत्या दोन तीन दिवसांत ही खरेदी पूर्ववत होणार असल्याचे केंद्रसंचालकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आता जिल्ह्यातील मोजक्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : मानवत बाजारात 'इतके' लाख क्विंटल कापूस खरेदी वाचा सविस्तर