यवतमाळ : कापूस खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर (Software) मागील आठ दिवसांपासून बंद पडले आहे. यात संपूर्ण देशभरात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने कापूस खरेदीचा पेच निर्माण झाला आहे.
प्रारंभी एका दिवसात यातील तांत्रिक अडचण दूर होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात आठ दिवस झाले तरी यातील तांत्रिक अडचण दूर झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांची हमी केंद्रावरील कापूस खरेदी (Cotton Procurement) वांद्यात सापडली आहे.
१५ जिल्ह्यांतील १५ केंद्र ऑनलाइन प्रक्रियेअभावी बंद
खुल्या बाजारात कापसाचे दर घसरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस संकलन केंद्राकडे आपला मोर्चा वळविला होता. कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर अचानक गर्दी वाढली आहे.
याचवेळी कापसू खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर बंद पडले. ११ फेब्रुवारीला बंद पडलेले हे सॉफ्टवेअर अजूनही दूरुस्त झाले नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहे. या शेतकऱ्यांनी खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे.
कुठल्या बाबी आहे सॉफ्टवेअरमध्ये
कापूस खरेदी करतांना शेतकऱ्यांचे नाव, त्याचा सातबारा, त्या केंद्रावरील एकूण खरेदी आणि त्याला चुकारा किती द्यायचा, शेतकऱ्यांचे खाते ऑनलाईन आहे का, शेतकऱ्यांचा पेरा आणि त्यांनी आणलेला कापूस यात ताळमेळ बसतो का, एकूण कापूस गाठी किती तयार झाल्या. पेमेंट किती आले, किती पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात वळते झाले. याची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये आहे.
सॉफ्टवेअर का थांबले
संपूर्ण देशभरातील तज्ज्ञ मंडळी सॉफ्टवेअरचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना मागील ७ दिवसात यातील तांत्रिक अडचण दूर करता आली नाही. यामुळे देशभरातील कुठल्याही राज्यातून या सॉफ्टवेअरला गेल्या आठ दिवसात सुरू करता आले नाही.
दुरूस्ती कधी होणार
गेल्या ८ दिवसात या कामात दुरूस्ती करता आली नाही. यामुळे पुढे यात दुरूस्ती कधी होणार हे सांगता येणार नाही. जेव्हा दुरूस्ती होईल त्याचवेळी हे सॉफ्टवेअर कापूस खरेदी करीता वापरले जाणार आहे. यामुळे तूर्त शेतकऱ्यांना दुरूस्तीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.