मोहन बोराडे
Cotton Market : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस यार्डात यंदा लिलाव पद्धतीने खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कापूस खरेदीचा आकडा ३ लाख ७ हजार क्विंटलवर जाऊन पोहोचला, तर नव्यानेच स्थापन झालेल्या खासगी बाजार समितीकडून सव्वादोन लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून, १५ जुलैपासून बाजार समितीची कापूस खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित कापूस खरेदी होणार तर कधी असा सवाल शेतकरी करत आहेत.
शहरासह परिसरात जवळपास अकरा कापूस जिनिंग प्रेसिंग आहेत. त्यावर प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शहरात दरवर्षी ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असल्याने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर पिके घेतली जातात. त्यातच सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापसाला विक्रमी भाव मिळाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी गतवर्षी खरीप हंगामात कापसाची लागवड करण्याकडे पुन्हा एकदा वळले आहेत.
परंतु, ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर कापसाच्या उत्पन्नात घट झाली होती. त्यातच कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली. भाव वाढेल या अपेक्षेवर अनेक महिने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला नव्हता.
परंतु, मे, जून महिन्यात मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस विक्री केला. निमशासकीय बाजार समितीकडून २७ ऑक्टोबर पासून कापूस खरेदी सुरू केली होती. यंदा शहरातील दोन व्यापाऱ्यांनी खासगी बाजार समितीची परवानगी मिळवली. त्यामुळे आठवड्यातील तीन-तीन दिवस दोन्ही बाजार समितीकडून कापूस खरेदी करण्यात आली.
सर्वाधिक आवक जून महिन्यात• निम्नशासकीय बाजार समितीकडून तीन लाख सात क्विंटल तर खासगी बाजार समितीकडून जवळपास सव्वादोन लाख क्चिटल कापूस खरेदी करण्यात आली. कापूस खरेदी हंगाम सुरू झाल्यानंतर आज न उद्या कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.• हंगामात जून महिन्यात काहीच दिवस ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कापसाच्या प्रतवारीनुसार सहा हजारापासून कापूस विक्री करावा लागला. सर्वाधिक आवक जून महिन्यात झाली.
बाजार समितीचे उत्पन्न घटले• येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला सर्वाधिक उत्पन्न कापूस खरेदीवर मिळते. या उत्पन्नातून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन व आर्थिक बजेट अवलंबून आहे.• मात्र, शासनाकडून शहरात दोन खासगी बाजार समितीची परवानगी मिळाल्यानंतर या बाजार समित्यांनी जवळपास सव्वादोन लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. परिणाम निमशासकीय बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली आहे.
मागील दहा वर्षांतील कापूस खरेदी
२०१४-१५ ८ लाख १२ हजार२०१५-१६ ३ लाख ४० हजार२०१६-१७ ४ लाख ४१ हजार२०१७-१८ ६ लाख ३७ हजार२०१८-१९ ४ लाख ५० हजार२०१९-२० ८ लाख ६० हजार२०२०-२१ ६ लाख ०९ हजार२०२१-२२ ३ लाख ६२ हजार२०२२-२३ ५ लाख २२ हजार२०२३-२४ ३ लाख ७ हजार