यंदा पावसाच्या दीर्घ उघडीपीमुळे खरिपांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वांत जास्त पिकणाऱ्या कापसाला आणि सोयाबीनला मोठा फटका बसला असून यंदाच्या हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरूवात झाली आहे. सध्या बाजारभाव स्थिर राहणार असल्याच्या चर्चा व्यापाऱ्यांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या दराने कापूस विक्री करताना दिसत आहेत.
यंदा भारतासहित ब्राझील, अमेरिका, चीन यांसारख्या देशांतही कापसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे साहजिकच दर वाढणे अपेक्षित होते पण तसं होताना दिसलं नाही. सध्या कापसाचे दर हमीभावाच्या आसपास रेंगाळताना दिसत आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील कापूस सरल्यानंतर दर वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण सध्या सुरूवातीच्या टप्प्यातील कापूस ओला असल्याने शेतकऱ्यांना या कापसाची साठवणूक करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मिळेल तो दर शेतकरी घेताना दिसत आहेत.
केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला ६ हजार ६२० तर लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये दर जाहीर केला आहे. आजच्या बाजारभावाचा विचार केला तर उमरेड बाजार समितीत ७ हजार २०० रूपये एवढा कमाल दर मिळाला. तर बारामती बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. कापसाच्या गाठींचे उत्पादन यंदा जरी कमी होणार असले तरी कापसाचे दर मात्र बाजारात स्थिर असल्याचं चित्र राज्यभरात आहे.
राज्यातील आजचे कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
03/11/2023 | ||||||
मारेगाव | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 176 | 6890 | 7090 | 6990 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 151 | 7100 | 7260 | 7200 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 210 | 6900 | 7151 | 6950 |
काटोल | लोकल | क्विंटल | 6 | 7150 | 7150 | 7150 |
कोर्पना | लोकल | क्विंटल | 128 | 6200 | 6900 | 6500 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 800 | 7000 | 7200 | 7100 |