यंदा कमी पावसामुळे नगदी पीक असलेल्या कापसासह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले असून आता कापसाचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पांढरे सोने घरातच थप्पी लावून ठेवणे पसंत केले आहे. सद्यस्थितीत बाजारात कापसाला ६ हजार ९०० रुपये ते ७००० क्विंटलचा भाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून कापसाची भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. खर्च अधिक आणि भाव कमी अशा दुहेरी संकटात शेतकरी असून याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
थोड्याफार खर्चासाठी विकला जातो कापूस
शेतकरी गरजेपुरता कापूस विकून तात्पुरता खर्च भागवत आहेत. त्यामुळे घरात मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक केली आहे. सध्या दहा हजारांपेक्षा अधिक भाव। मिळेल, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
भाववाढीची प्रतीक्षा
■ गेल्या काही वर्षात कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.
■ मात्र, यावर्षी कापसाला मुहूर्तावर कमी भाव निघालेल्या सहा हजार पाचशे ते सात हजार भावाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या कापसाला ७ हजार रुपये भाव मिळत आहे. पण मागील वर्षीसारखा भाव मिळेल, या आशेने सध्या कापूस विक्री थांबली आहे. -महादेव मोरे, शेतकरी
माजलगाव तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या काही वर्षांत कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र, यावर्षी कापसाला मुहूर्तावर कमी भाव निघालेल्या ६ हजार पाचशे ते ७ हजार भावाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा कापसाला प्रतिक्विंटल दहा ते बारा हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता होती,उत्पादन कमी झाले असतानाही भाववाढ झाली नाही. यातही कापूस पिकासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा सात हजारांचा भाव या दोन्ही बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नाही.
कापसाला कमीत कमी दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळावा, अशी मागणी आहे. पुढील काही दिवसांत कापसाला दहा हजारांपुढे भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे.दरम्यान, शेतकरी जसा घरखर्च लागेल तसा किलोने कापूस विकत आहेत. कापसाला पुढील काळात अजून भाव येईल, या आशेने ठोक कापूस विकत नाहीत. अनेक शेतकऱ्यांना गतवर्षीचा कापूस अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस दिसून येतो.