जळगाव जिल्ह्यात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे भाव आता हमीभावापेक्षाही कमी झाले आहेत. त्यामुळे आधीच असलेला भाव परवडत नसलेल्या कापूस उत्पादकांनी जिनींगसह सीसीआयच्या केंद्राकडे पाठ फिरवली आहे. कापसाचे दर खासगी बाजारात ६५०० ते ६८०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे जिनींगवर शुकशुकाट दिसून येत आहे. तर शेतकऱ्यांनीही आता भाव वाढीपर्यंत कापूस विक्री न करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय.
जळगाव जिल्ह्यात यंदा ५ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. खान्देशात एकूण १५ लाख गाठींची खरेदी जिनींगमध्ये होण्याचा अंदाज होती. मात्र, डिसेंबर संपण्यात असताना देखील खान्देशात आतापर्यंत ४ लाख गाठींची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात ६० ते ६५ टक्के माल अजूनही पडून आहे.
सूताची मागणी घटल्याने कापसाला उठाव नाही
- आंतरराष्ट्रीय बाजारात सूताची मागणी घटली आहे. भारतातून सूताची निर्यात थांबली आहे. त्यामुळे सूतगिरण्यांकडे असलेला मालच पडून आहे. अशा परिस्थितीत नवीन मालासाठी कापसाला मागणी नाही.
- सूताला मागणी वाढून, जर निर्यात सुरू झाली तर भारतातच कापसाला २ मागणी वाढू शकते. मात्र, सध्यस्थितीत तशी स्थिती दिसून येत नाही.
- दुसरीकडे भारतीय गाठींचे दर ५९ हजारवरून ५५ हजारवर आले असताना, ३ भारताच्या कापसाला मागणी नाही. भारतीय मालासोबतच ब्राझील, अमेरिकेसारख्या देशांच्या गाठींचे दर ५२ हजारावर आले आहेत. त्यामुळे आयातदार देश भारतापेक्षा इतर देशाचा कापूस खरेदी करत आहेत.
कापसाच्या गुणवत्तेनुसार भाव, तीन विभागात केली विभागणी■ कोरडा व चांगला माल - ६७०० ते ६८०० रुपये क्विंटल■ ओलावा असलेला माल ६२०० ते ६४०० रुपये क्विंटल■ बोंडअळीमुळे नुकसान झालेला माल - ५८०० ते ५९०० रुपये क्विटल
पणनला मंजुरी, सीसीआयच्या केंद्रावर शुकशुकाटराज्य शासनाने पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, दुसरीकडे सीसीआयच्या केंद्रावरच शुकशुकाट असताना पणनचे केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता कमीच आहे. जळगाव जिल्ह्यात पणनचे तीन ते चार केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी दिली. सीसीआयच्या केंद्रावर नोंदणी, कागदपत्रांची मागणी, सीसीआयचे असलेले अनेक निकष यामुळे शेतकरी सीसीआयच्या केंद्रावर जाणे टाळत आहेत.
कापसाच्या मार्केटसाठी या वर्षासारखे मंदीचे वर्ष आपण आतापर्यंत पाहिलेले नाही. सूतगिरण्या बंद आहेत. जिनर्स, निर्यातदार व शेतकऱ्यांनाही यामुळे फटका बसत आहे. कापसाला उठावच नसल्याने काँटन बाजारात मंदीचे सावट दिसून येत आहे. परिस्थिती केव्हा बदलेल हे देखील सांगणे कठीण आहे.-प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन
कापसाचे दर खासगी बाजारात कमी झाले आहेत. सूताला मागणी नसल्याने, निर्यात थांबली आहे. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. सूताची निर्यात वाढली तर दर वाढू शकतात. मात्र, तशी परिस्थिती सध्या दिसत नाही.- हर्षल नारखेडे, आंतरराष्ट्रीय कॉटन बाजाराचे अभ्यासक