अति पाऊस, बोंडअळी अशा कारणांमुळे कापसाच्या २०२४-२५ या वर्षाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, खान्देशात यंदा हंगाम संपेपर्यंत ११ लाख गाठींची खरेदी झाली आहे. मागणी १६ लाख गाठींची असताना, यंदा मात्र केवळ ११ लाख गाठींची खरेदी खान्देशात झाली आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत कापसाची बऱ्यापैकी लागवड होते. त्यात जळगाव जिल्ह्यात एकूण लागवडीच्या तुलनेत ७५ टक्के लागवड होते. गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात कापसाची झालेली लागवड पाहता, खान्देशातून १६ लाख गाठींची खरेदी होण्याची शक्यता होती.
कापसाचे दर हमीभावापेक्षाही जास्त
यंदाच्या हंगामात कापसाला खासगी बाजारात हमीभावाइतकाही भाव मिळाला नव्हता. विशेष म्हणजे सीसीआयकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यातही अनेक प्रकारचे निकष लावल्यामुळे त्या ठिकाणीही शेतकऱ्यांच्या मालाला ७ हजार ते ७१०० रुपयेच भाव मिळाला. तर खासगी बाजारात ६६०० ते ६८०० पर्यंतचा भाव मिळाला.
मात्र, आता शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसताना, कापसाचे भाव मात्र हमीभावापेक्षाही जास्त म्हणजेच ७६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर चांगल्या मालाला काही ठिकाणी ८ हजार रुपयांचाही दर मिळत आहे. खान्देशात सर्वच ठिकाणी आवक पूर्णपणे थांबली आहे. ठरावीक शेतकऱ्यांकडेच माल शिल्लक असून, तो मालदेखील आता बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे.
मात्र, यंदा ११ लाख गाठींची खरेदी १२ एप्रिलपर्यंत झाली आहे. सद्यः स्थितीत २५ ते ९९ टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांकडील कापूस बाजारात आला आहे. त्यामुळे आता एकूण खरेदीत फार काही वाढ होण्याची शक्यता नाही.
गेल्या वर्षी जळगावसह खान्देशात जास्त पाऊस झाला. अतिपावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे एकरी उत्पादनात घट झाली होती. यासह बोंडअळीचाही प्रादुर्भाव झाला. यामुळे एकूणच उत्पादनात घट झाली आहे. - प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन.
गेल्या सात हंगामातील खान्देशात झालेली खरेदी
वर्ष | झालेली खरेदी... |
२०१८-१९ | १७ लाख गाठी |
२०१९-२० | १६ लाख गाठी |
२०२०-२१ | १८ लाख गाठी |
२०२१-२२ | १५ लाख गाठी |
२०२२-२३ | १६ लाख गाठी |
२०२३-२४ | १४ लाख गाठी |
२०२४-२५ | ११ लाख गाठी |