Join us

Cotton Rates : पंधरा दिवसांत कापसाचे दर वाढणार? जाणून घ्या अभ्यासकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 3:41 PM

यंदाच्या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

पुणे : यंदाच्या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दराने निराशा केली आहे. तर संपूर्ण हंगामात कापसाचे दर हे केवळ सात हजारांच्या आसपास असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मागच्या दहा वर्षांचा विचार केला तर तेव्हासुद्धा ७ हजारांच्या आसपास दर होता आणि आत्तासुद्धा सात हजारांवर दर असल्याने शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल दराने विक्री करावा लागत आहे. येणाऱ्या काळात कापसाचे दर कसे राहणार यावर कापूस अभ्यासक गोविंद वैराळे यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त कापसाचा पेरा झाला असून ४३ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. महाराष्ट्रात जमीन ओलिताचे प्रमाण केवळ १७% ते १८% असल्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मध्ये कापसाची लागवड जास्त प्रमाणात होते. तूर आणि सोयाबीनही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते.

केंद्र सरकारने कापसाचे किमान आधारभूत दर हे ७ हजार २० रुपये ठेवल्यामुळे कापसाचे दर वाढले नाहीत. मधल्या काही दिवसात कापसाचे दर हे ८ हजार ५०० रूपयापर्यंत गेले होते. परंतु मागच्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी घट झाली असून सरकीचे दरही अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाहीत. दरम्यान, यंदाचे कापसाचे उत्पादन वाढवून दाखवल्यामुळे कापसाचे दर वाढले नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

किती वाढणार कापसाचे दर?सध्या कापसाचे दर हे ७ हजार ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलच्या मध्ये असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळी कापसाचे दर हे ८ हजार ते ८ हजार ५०० रूपयांपर्यंत पोहोचू शकतील. परंतु, त्यापेक्षा जास्त दर वाढणार नाहीत अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे योग्य राहील असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा म्हणजे २०२३-२४ च्या खरीप हंगामातील कापूस पूर्णपणे निघालेला असून शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील कापसाचे उत्पादन हे एकरी चार क्विंटल असून जर सात हजार रुपयांचा दर मिळाला तर शेतकऱ्यांना केवळ एका एकरातून २८ हजार रुपयांचे उत्पन्न होते त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या बिकट आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारकापूस