Cotton Rates : सुगीचे दिवस सुरू झाले असून खरिपातील पिकांची काढणी सुरू झाली आहे. सोयाबीन, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद पिकांची काढणी चालू असून कापूसाच्या वेचण्या आता सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळे कापसाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना पावसामुळे कापूस वेचणीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तर सुरूवातीच्या कापसाला बाजारातही कमी दर मिळत आहे.
केंद्र सरकारने २०२४-२५ सालच्या हंगामात मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार १२१ रूपये प्रतिक्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५२१ रूपये प्रतिक्विंटल हमीभाव म्हणजेच किमान आधारभूत किंमत जाहीर केली होती. पण सध्या बाजारात ६ हजार ५०० रूपयांपासून ७ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळताना दिसत आहेत.
पणन मंडळाकडील बाजार समित्यांमधील माहितीनुसार अद्याप कापसाची बाजारातील आवक खूप कमी आहे. १९ सप्टेंबर रोजी धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये १५० क्विंटल तर २१ सप्टेंबर रोजी यावल बाजार समितीमध्ये ५८ क्विंटल मध्यम धाग्याच्या कापसाची आवक झाली आहे. येथे अनुक्रमे ७ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल आणि ६ हजार ४५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हे दर ७ हजार ५०० रूपयांच्या आसपास स्थिर राहणे अपेक्षित आहे.
कापूस साठवून ठेवताय?अनेक शेतकरी दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस विक्री करण्यासाठी घरात साठवून ठेवतात. अशा शेतकऱ्यांनी घरातील किंवा गोडाऊनमधील ओल्या कापसाला पलटी मारणे आवश्यक आहे. ओला कापूस तसाच ठेवला तर कापूस काळा पडण्याची भिती असते. कापसाला अंकूर फुटले तर तो कापूस विक्रीयोग्य राहत नाही. त्यामुळे साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी मालाची योग्य काळजी घेतली पाहिजे.
कापसाला का मिळतोय कमी दर?कापसाची पहिली वेचणी ही सप्टेंबरच्या दरम्यान होते. यावेळी मान्सूनचा किंवा परतीचा पाऊस सुरू असतो. शेतकऱ्यांना सर्वांत आधी पक्व झालेल्या बोंडातून कापूस काढावा लागतो. त्यामुळे पहिल्या वेचणीमध्ये ओलावा जास्त असतो. सारखा पाऊस सुरू असेल तर कापूस पूर्ण ओला असतो. या कापसाच्या बियांमधून अंकूर फुटतात. त्याचबरोबर कापूस काळा किंवा पिवळा पडतो. या कापसाला बाजारात मागणी कमी असते म्हणून सुरूवातीच्या कापसाला दर कमी मिळतो.
अनेक शेतकरी वेचणी केल्यानंतर कापूस वाळवतात. पण बऱ्याचदा वेचणीला उशिर झाला तर बोंडामध्ये असलेल्या ओल्या बोंडांच्या गाठी बनतात. पण पहिला कापूस वेचणी केल्यानंतर लगेच वाळवला पाहिजे किंवा त्यातील आर्द्रता काढूनच बाजारात विक्रीसाठी नेल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो.
सध्याचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
21/09/2024 | ||||||
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 58 | 6100 | 6750 | 6450 |
19/09/2024 | ||||||
धामणगाव -रेल्वे | एल. आर.ए - मध्यम स्टेपल | क्विंटल | 150 | 7400 | 7900 | 7600 |