Join us

बाजारभावाच्या कचाट्यात कापूस घरातच; शेतकरी मेटाकुटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 9:18 AM

कापसाचे बाजारदर दबावात असल्याने शेतकरी मेटाकुटीस

लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू होऊन राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. दिवाळीत कापूस निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड होते. मात्र, कापसाला भावच नसल्याने शेतकऱ्यांनी तो घरीच ठेवला. भाव मिळेल या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले. आता होळी-पंचमीचा सणही झाला आणि गुढीपाडवा जवळ आला तरीही कापसाला भाव मिळत नसल्याने कापूस घरात ठेवणे ही शेतकऱ्यांचीच चूक अस म्हणताना व्यापारी वर्ग दिसून येत आहे.

भाव कधी वाढणार, घरात किती दिवस कापूस ठेवायचा, असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांच्या पुढे आहे. उत्पादन खर्च वाढूनही कापसाचा भाव सात हजार पाचशे रुपयांच्या पुढे जात नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षांत कापसाचे उत्पादन घेणारे जमिनीचे क्षेत्र वाढले. मात्र, त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नाही. सध्या कपाशीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होत असली तरी ती शेतकऱ्यांना फारशी लाभदायक ठरत नाही. कारण, औषधी आणि इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचा हाती फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत असतो. यंदा सतत पाऊस आल्याने कपाशीचे उत्पादन होईल किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह होते.

मात्र, दिवाळीनंतर कपाशीला दिलासा मिळाला. कापूस निघाल्यानंतर सुरुवातीला भाव दहा हजारांच्या आसपास होता. त्यानंतर काही दिवसातच भावात मोठी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीसाठी कापूस विकणे बंद केले.

गेल्या दोन महिन्यांपासून आठ हजार पाचशे रुपये असलेला भाव सात हजार पाचशेवर आला आहे. यातून शेतकऱ्यांना कपाशी लागवडीसाठी लागलेला खर्च, फवारणीचा खर्च काढून शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सादर केलेल्या बजेटमध्ये दिलासा न देता शहरी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे काय? चार महिन्यांपासून कापूस कुलूपबंद आहे.

सुरुवातीची चूक आली शेतकऱ्यांच्या अंगलट

• दोन वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळात कापसाला दहा हजारांवर भाव होता. हा भाव बऱ्यापैकी होता. मात्र, यंदा उत्पादन कमी झाले असले तरी सुरुवात सहा हजारांपासून सुरू आहे. भविष्यात कापसाला चांगला भाव मिळेल. या आशेवर शेतकऱ्यांनी त्यावेळी कापूस विकला नाही.

• तीच चूक आता शेतकऱ्यांच्या अंगलट आली आहे. त्यावेळी शेतकयांनी कापूस विकला असता तर आता कापूस घरात भरून ठेवण्याची वेळ आली नसती. गेल्या चार महिन्यांपासून कापूस घरी असल्यामुळे कापसात घट होण्याची शक्यता आहे.

सरकारने उपाय योजना करावी

कापूस घरी पडून असल्यामुळे चिंता वाढली आहे. कापसाला भाव मिळत नाही. सरकारचे धोरणही शेतकरी विरोधात आहे. भाववाढीची आता आशा नाही. कमी भावात कापूस विकून नुकसान सहन करावे लागणार आहे. सध्या तरी काही उपाय दिसून येत नाही. सरकारने यावर उपाययोजना करावी. अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. - राजू दळवी, येवता कापूस उत्पादक

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीबाजारगुढीपाडवा