Join us

तासगाव आणि सांगलीचे बेदाणे सौदे बंद; अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:23 AM

बेदाणा व्यापाऱ्यांकडे तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकल्यामुळे अडते आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातूनच अडत्यांनी सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदे गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहेत.

अशोक डोंबाळेसांगली : बेदाणा व्यापाऱ्यांकडे तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकल्यामुळे अडते आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातूनच अडत्यांनी सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदे गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहेत. व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यानंतरच बेदाणा सौदे सुरू करण्यात येतील, असा इशारा अडत्यांनी दिला आहे.

सांगली आणि तासगाव बेदाणा सौद्यात एकावेळी तीन हजार टन बेदाण्यांची आवक होत आहे. सांगलीत बुधवारी आणि शुक्रवारी तर तासगावमध्ये सोमवार, गुरुवार आणि शनिवारी बेदाणा सौदे होत आहेत. बेदाण्याचा हंगाम असल्यामुळे आवकही मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे तेही विक्रीसाठी आणत आहेत.

महिन्याला जवळपास दोन्ही ठिकाणी ५१ हजार टन बेदाण्याची विक्री होत आहे. फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांनी अडत्यांचे जवळपास ४६० कोटी रुपये थकविले आहेत. व्यापाऱ्यांकडून ४० दिवसांत अडत्यांना पैसे मिळाले पाहिजेत, असा नियम सांगली आणि तासगाव बाजार समितीने केला आहे.

व्यापाऱ्यांकडून तीन महिने झाले तरीही अडत्यांना पैसे मिळाले नाहीत. पैशासाठी अडत्यांनी व्यापाऱ्यांकडे तगादा लावल्यानंतर बेदाणा खराब असल्याचे कारण देत व्यवहार रद्द करण्याची धमकी दिली जात आहे.

व्यापाऱ्यांच्या या भूमिकेला कंटाळून अडत्यांनी गेल्या चार दिवसांपासून सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदेच बंद केले आहेत. व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यानंतरच सौदे सुरू करण्याची भूमिका अडत्यांनी घेतली आहे. अडत्यांच्या भूमिकेचा शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक फटका बसला आहे.

बेदाण्याचे असे आहे अर्थकारण- सांगली आणि तासगाव सौंद्यात महिन्याला ५१ हजार टन बेदाण्याची उलाढाल होते. तीन महिन्यांत जवळपास एक लाख ५३ हजार टन बेदाण्याची खरेदी-विक्रीची उलाढाल झाली आहे.या बेदाण्यास सरासरी १२० रुपये किलो दर धरल्यास एक हजार ८३६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यापैकी काही व्यापाऱ्यांनी पैसे दिले आहेत.पण, उर्वरित ४६० कोटी रुपये गेल्या तीन महिन्यांपासून व्यापाऱ्यांनी अडत्यांचे थकीत ठेवले आहेत. म्हणून अडत्यांनी बेदाणा सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर सौदे कसे काढणार?- व्यापाऱ्यांनी सौद्यात बेदाणा खरेदी केल्यानंतर सांगली बाजार समितीच्या नियमानुसार ४० दिवसांत अडत्यांना पैसे दिले पाहिजेत. अडत्यांकडे पैसे आल्यानंतर पुढे ते शेतकऱ्यांना देणार आहेत. असे असतानाही व्यापाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात खरेदी केलेल्या बेदाण्याचेही पैसे अद्याप दिले नाहीत.अडते व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणूनच व्यापाऱ्यांनी पैसे देईपर्यंत सांगली व तासगाव येथील बेदाणा सौदे बंद ठेवणार आहे, अशी माहिती तासगाव व सांगली बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.

अधिक वाचा: वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसांगलीतासगाव-कवठेमहांकाळद्राक्षे