डाळिंबाचा आंबे बहार हंगाम संपत आला असून, बाजारातडाळिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नागरिकांना प्रतिकिलोसाठी १५० ते १७० रुपये मोजावे लागत आहेत.
पुणे मार्केट यार्ड, मोशी कृषी उपबाजार समितीत अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून डाळिंबाची आवक होत आहे. डाळिंबाला यंदा मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे आंबे बहरातील डाळिंब पिकाची फुले गळाल्यामुळे उत्पादन घटले आहे. दरवर्षी मार्केट यार्डात मोशी बाजारात ऑगस्ट महिन्यात ७० ते ८० टन आवक असते.
यंदा मात्र, ३५ ते ४० टनच आवक होत आहे. डाळिंबाच्या खरेदीसाठी व्यापारी डाळिंब पट्टयात दाखल होऊ लागले. प्रतिकिलो १५० रुपये दर डाळिंबाच्या खरेदीसाठी व्यापारी डाळिंब पट्टयात दाखल होऊ लागले आहेत.
बांधावर डाळिंबाला प्रतिकिलो ९० ते १५० रुपये दर दिला जात आहे. त्यामुळेही बाजारात डाळिंबाची आवक मंदावली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो ५० ते १५० रुपये दर मिळत आहे, तर किरकोळ बाजारात १५० ते १७० रुपये दर आहे.
डाळिंबाचे फायदे
डाळिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. डाळिंब हे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर, पोषक तत्त्व असतात.
वर्षात डाळिंबाचे दोन बहार
डाळिंबाचे मृग बहार व आंबे बहार असे दोन हंगाम असतात. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्याची सोय असलेल्या ठिकाणी आंबे बहार धरण्याची पद्धत आहे. या बहारात फळे एप्रिल ते ऑगस्टपर्यंत मिळतात, तर मृग बहाराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत मिळतात.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाची आवक कमी आहे. आवक अशीच कमी राहिली, तर दिवाळीपर्यंत दर तेजीत राहतील. - सिद्धार्थ खैरे, डाळिंब व्यापारी
उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. - बाळासाहेब मांडगे, शेतकरी