बोर्डी : गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला अळूवडीचा नैवेद्य देण्याची पद्धत असून, महिला वर्गाकडून अळूच्या पानांची खरेदी केली जात आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील समुद्रकिनारी भागात शेतकरी अळूची शेती करतात. उत्सवाच्या निमित्ताने या पानांना मागणी वाढली आहे.
श्रावण महिना आणि सणासुदींच्या दिवसांत अळूची पाने आणि त्याच्या देठींना मागणी असते. गणेशोत्सवात बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यापासून ते उत्तर पूजेआधी दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात अळूवडीला प्राधान्य दिले जाते.
याशिवाय देठींचा भाजी व आमटीत वापर केला जातो. औषधी गुणधर्म असलेले हे पदार्थ लहानांपासून ते ज्येष्ठांना प्रसाद म्हणून ताटात वाढले जातात.
५० पानांची चवड• या भागातून प्रतिदिन हजारो अळूची पाने मुंबईच्या बाजारात पाठविली जातात. त्याशिवाय हॉटेल व्यावसायिकांकडूनही वर्षभर असणारी मागणी या काळात वाढते.• वसईपासून ते थेट बोडींपर्यंत स्थानिक बाजारात त्यांची विक्री होते. एकावर एक १० पाने रचून, ५० पानांची चवड बनवून केळीच्या वाखाने बांधली जातात. प्रती शेकड्याने पानांची मोजणी होते.• स्थानिक घाऊक बाजारात २०० ते ३०० रुपये प्रति शेकडा असणारी ही पाने मुंबईत ५०० ते ६०० रुपये शेकडा दराने उत्सव काळात विकली जात आहेत.• काही ठिकाणी थेट व्यापारी शेतीच्या बांधावर येऊन उत्पादन घेऊन जातात, पालघर जिल्ह्यात फूल, भाजीपाला आणि फळबागायतीत आंतरपीक म्हणून अळूची शेती केली जाते.