Join us

लग्नसराईमुळे 'मिरची'ला मागणी; प्रतिकिलोचे दर मात्र स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 11:16 AM

ग्राहकांची पसंती ब्याडगी, तेजा, गुंटूरला

तुलसी विवाहानंतर लग्नांची धामधूम सुरू झाली आहे. लग्नसराईमुळे लाल मिरचीला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून मागणी आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी भाव वधारले आहेत. सध्याला भाव मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. डिलक्स ड्राय ब्याडगी प्रतिकिलो ६०० रुपये, डिलक्स ड्राय गुंटूर ३०० ते ३२० रुपये, डिलक्स ड्राय तेजा ३०० ते ३२० रुपये असून, सर्वसाधारण संकरित मिरची २५० रुपये प्रतिकिलो आहे.

मानवी जीवनात दैनंदिन आहारात लाल मिरचीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरगुती जेवण असो वा मेजवानी, मिरचीशिवाय चवच येत नाही. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरातील लोह वाढविण्याचे प्रमुख कार्य मिरची करते. देशभरात मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. दक्षिण भारतातील मिरचीला लातूर परिसरात मोठी मागणी आहे. लातूरसह सीमा भागात दक्षिण भारतातील मिरचीला ग्राहकांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हीच मिरची लातूरच्या बाजारात भाव खाऊन जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहा ते पंधरा टक्के दरवाढ झाली आहे. सध्या लग्नसराई असल्याने ही दरवाढ आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

संबंधित वृत्त: लाल मिरचीच्या लागवडीतून मिळाले एकरी ३ लाखाचे उत्पन्न

ग्राहकांची पसंती ब्याडगी, तेजा, गुंटूरला

दक्षिण भारतातील ब्याडगी, तेजा, गुंटूर मिरचीला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांतून पसंती आहे. त्याचबरोबर असंख्य संशोधित संकरित मिरचीचे प्रकारही बाजारात दाखल आहेत.

ब्याडगी मिरची खाण्यास चवदार, सौम्य तिखट आणि रंगाला भरपूर लाल असते. रंगासाठी या मिरचीचा प्रामुख्याने वापर केला जातो. हॉटेल, ढाबाचालकांकडून ब्याडगीला मागणी आहे.

संबंधित वृत्त: सुकवण्यासाठी ठेवलेली ३० हजार क्विंटल मिरची 'पाण्यात!

तेजाप्रमाणेच चवीला जहाल...

तेजा नावाप्रमाणेच अतिशय जहाल आहे. तिखट आणि झणझणीत रस्सा हवा असणाऱ्यांमधून तेजा मिरचीला मागणी आहे. अलीकडे संकरित संशोधित जाती भरपूर उत्पादन होत असल्याने शेतकरी तेजा मिरचीच्या उत्पादनाकडे वळले.

उत्पादनात यंदा घट; नववर्षामध्ये भाववाढ?

देशभरात दोन्ही हंगामांत मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली जाते. विशेष म्हणजे, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांतील मिरचीला लातूर परिसरात मागणी आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनात घट झाल्याने नववर्षामध्ये काही प्रमाणावर भाव वधारण्याचे संकेत आहेत.- प्रदीप स्वामी, व्यापारी, लातूर

टॅग्स :बाजारमिरचीमार्केट यार्ड