अनिल महाजन
उन्हाळ्यात लग्नसराईची धूम सुरू झाल्याने विविध प्रकारच्या फुलांची मागणीदेखील वाढली आहे. परिणामी, फुलांच्या भावात वाढ झाल्याने नवरा-नवरीचा चांगल्या दर्जाचा हार चार ते साडेचार हजारांपर्यंत गेला आहे. लग्नामधील मंडप सजावटीवर भर दिला जात असून, सजावटीनुसार दर आकारले जात आहेत.
उन्हाळा सुरू झाल्याने लग्नाचे मुहूर्त आहेत. मुहूर्तावर बीड जिल्ह्याच्या धारूर शहर, परिसरातच एकाच दिवशी पाच ते सहा लग्न असतात. लग्न समारंभात आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले वधू- वरांचे स्टेज सजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट केली जाते. स्टेज सजविण्यासाठी निशिगंधा, जरबेरा, झेंडू, मोगरा, गुलाब आदी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे फूल विक्रेते सांगतात.
जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाब, ऑर्किड या सुगंधी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषतः सुगंधी फुलांना मोठी मागणी असल्याने या फलांचे भाव वाढले आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे फुलशेतीचेही नुकसान झाल्याने फुलांची आवक कमी होण्याची भीती वर्तविली जात आहे. आवक कमी झाल्यास फुलांच्या किमती आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नवरा-नवरीचा हार दोन हजारांपासुन उपलब्ध आहे.
वाहन सजावटीसाठी फुलांचा वापर
१. लग्नसराईच्या हंगामात वाहन सजा- वटीपासून ते व्यासपीठ मंच सजवि ण्यासाठी फुलांचा वापर केला जातो.
२. गाडीच्या दोन्ही बाजूंना माळा आणि बुके वापरून गाडीची सजावट करण्यात येते. फुलांच्या किमतीत वाढ झाली असली तरी वाहन सजावटीचा आग्रह कायम असतो.
काय आहे फुलांचा भाव?
गुलाब १० ते २० रुपये प्रति फूल, शेवंती - ७० ते ९० रुपये किलो, लीली - ४० ते ५० रुपये किलो, गिलार्डी - ७० ते ९० रुपये किलो, निशिगंधा -२८० ते ३०० रुपये किलो, झेंडू - ४० ते ७० रुपये किलो.
हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?
नवरा - नवरीचे हार
गुलाब फुल ९०० ते १२०० रुपये तसेच डबलपाती गुलाब हार ५०० ते १००० रुपये तर चमकी निशिगंध हार ३०० ते ७०० रुपये याप्रमाणे नवरा- नवरीच्या हाराचे भाव सध्या बाजारामध्ये असून, उन्हाळ्यामुळे हे भाव वाढलेले आहेत.
मंडपाला फुलांची सजावट
वधू-वरांचा मंडप सजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची आवश्यकता असते. मंडप सजावटीसाठी २० हजारांपासून १ लाखांपर्यंत खर्च येत येत असल्यामुळे विविध, रंगीबेरंगी फुलांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.