नवरात्रीत माळेसाठी लागणारी तिळाची फुलं कमी झाल्याने यावर्षी या फुलांना प्रचंड मागणी होती. पावसाच्या बदलत्या चक्रात ही पिके टिकत नसल्याने व दिवसेंदिवस जुने वाण संपत चालल्याने तिळाच्या फुलांची शेती कमी झाली आहे.
नुसत्या खुरासणीचे क्षेत्र कमी झाले नाही तर नाचणी, सावा, वरई, तूर, मूग, नागली, उडीद असे कठण मठणाचे गावठी वाणसुद्धा कमी झाले आहेत. त्यामुळे हे जुने वाण संपत चालले असून अजून काही वर्षांत हे गावठी वाण शिल्लकसुद्धा राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. या वाणांमध्ये कष्ट भरपूर मात्र उत्पन्न चांगले मिळेल याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी हे वाण वापरणे कमी केले आहे. आदिवासी डोंगराळ भागातील मोजक्याच काही गावांमध्ये सध्या याची शेती केली जाते, तर पाणी असलेल्या सधन भागात ही पिके जवळजवळ नसल्यासारखीच झाली आहेत.
अल्प लागवडयावर्षी नवरात्रात तिळाच्या फुलांना प्रचंड मागणी आहे. बाजारात विक्रीसाठी आलेली फुले शिल्लक राहत नाहीत. काही ठिकाणी १५ ते २० रुपयांना या फुलांचा वाटा मिळत आहे. काही लोकांनी फुले महाग झाल्याने माळेत तीन ते चार फुले तिळाची व बाकी झेंडूची लावून माळ तयार केली. याच्या मागे प्रमुख कारण म्हणे तिळाची म्हणजेच खुरासणी, कारळाची शेती कमी झाली. एकट्या आंबेगाव तालुक्याचा विचार केला असता पाच वर्षांपूर्वी १९५ हेक्टर खुरासणीचे क्षेत्र होते. मात्र आता हे पीक अवधे २० ते ३० हेक्टर उरले आहे. खुरासणी टाकून केलेले काळे कालवण आजसुद्धा अनेकांच्या तोंडाला पाणी सोडते; परंतु दिवसेंदिवस पावसाच्या बदलत्या चक्रामुळे या पिकाला फटका बसत असल्याने, क्षेत्र कमी झाले आहे.