Join us

तूरडाळीची मागणी वाढली; दर आणखी वाढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 9:51 AM

लग्नसराईमुळे मागणी वाढली असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे

मागीलवर्षी पावसाची अनियमितता झाल्याने खरीप पिकांवर याचा परिणाम झाला आहे. परिणामी, बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तुरीचे दर वाढत आहेत. मागील महिन्यात १३० ते १४० रुपयांनी मिळणारी तूरडाळ गुरुवारी शहरात १५० ते १६० रुपयांनी विक्री झाली. तसेच आगामी दोन महिने डाळींचे दर वाढते राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी होते. यामुळे तूर फुलावस्थेत असताना पिकाला पाणी मिळू शकले नाही. यामुळे राज्यभर तुरीचे उत्पादन कमी राहिले, दोन महिन्यांपूर्वी ९ ते १० हजार रुपयांनी विक्री होणारी तूरडाळ सध्या १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच यापुढे देखील तुरीचे भाव वाढणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, याचा परिणाम तूरडाळीवर देखील होत असून, महिनाभरात डाळीचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत.

मात्र आता जून-जुलैनंतर म्यानमारमधील डाळीची आयात होण्याचा संभव असल्याने पुढे अजून दोन महिने दरात स्थिरता राहणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

मागणीही वाढली

तूरडाळीमुळे जीवनसत्त्वांचा अभाव दूर होतो. लहान मुलांपासून वयोवृद्धांनाही डाळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे डाळींचे दर वाढल्याने ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसतो. दरम्यान, सध्या लग्नसराई सुरू असल्याने विविध प्रकारच्या डाळींची मागणी वाढलेली आहे. आगामी दोन महिने दरात तेजी असणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

१० टक्क्यांनी दरात वाढ

मागील महिनाभराच्या तुलनेत एप्रिल महिन्यात तुरीला भाव आला आहे. याचा परिणाम डाळींवर देखील झाला असून, या महिन्यात १० टक्क्यांनी तुरीच्या डाळीचे दर वाढले आहेत. पुढचे दोन महिने डाळीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

मागील काही वर्षांपासून तूरडाळीचे दर वाढलेले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी जास्त पाऊस तर कधी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, तुरीच्या पिकाला जास्त पाणी लागत नाही. तसेच कमी पावसाने देखील धारणेवर परिणाम होतो, उत्पादन कमी झाल्याने तुरीचे भाव वाढत आहेत. पुढच्या दोन महिन्यांत तुरीचे दर १८० रुपयांपर्यंत जाण्याचा आमचा अंदाज आहे. - मीत शहा, व्यापारी

टॅग्स :तूरबाजारशेतकरीशेतीकबुतर