सांगली येथीलमार्केट यार्ड हळदीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. दरही गेल्या २० वर्षातील उच्चांकी असूनही हळदीची आवक दिवसेंदिवस घटत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ११ लाख ६१ हजार ३२५ क्विंटल राजापुरी हळदीची आवक होती.
यामध्ये २०२४-२५ मध्ये चार लाख २२ हजार क्विंटल घट होऊन ७ लाख ४० हजार २३९ क्विंटल आवक झाली आहे. हळदीला दराची चकाकी असतानाही आवक घटत आहे. याबाबत सांगलीबाजार समिती प्रशासन, संचालक आणि व्यापाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
वसंतदादा मार्केट यार्डच्या स्थापनेपासून (१९५०) हळदीची बाजारपेठ तेजीत राहिली आहे. येथील व्यापाऱ्यांची विश्वासार्हता देशभर प्रसिद्ध असल्यामुळे शेतकरी हक्काने शेतीमाल विक्रीसाठी आणत होते. पण, सांगली बाजार समितीने गेल्या ७५ वर्षांत बाजारपेठ विकसित करण्यासह व्यापारी, शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले.
तसेच व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हळूहळू येथील हळद बसमत (जि. हिंगोली) सह अन्य ठिकाणी गेली आहे. काही व्यापाऱ्यांनी कर्नाटकातून थेट खरेदी-विक्री सुरु केली आहे. यामुळेही राजापुरी, परपेठ हळद आवक कमी झाली असेल, असा अंदाज हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत हळदीची आवक ७ लाख ४४ हजार क्विंटल झाली असून दर सरासरी १६ हजारांवर आहे. हळदीला चकाकी असतानाही गतवर्षीच्या तुलनेत ४ लाख २२ हजाराने आवक घटली आहे.
उत्पन्न घटल्यामुळे आवक कमी : सुजय शिंदे
हळद लागणीच्या दरम्यान आणि त्यानंतर संततधारेमुळे उत्पन्नात घट झाली आहे. यामुळेच सांगली मार्केट यार्डात हळदीची आवक कमी झाली आहे. सांगली बाजार समितीकडून मार्केट यार्डामध्ये मूलभूत सुविधा दिल्या आहेत. संचालक मंडळ आणि प्रशासनाने नेहमीच हळदीसह शेतमालाची आवक वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, अशी प्रतिक्रिया सुजय शिंदे यांनी दिली.
हळदीची २० वर्षातील आवक
वर्ष | आवक क्विंटल | दर |
२००५-०६ | ४२२१५९ | ३३८१ |
२००६-०७ | ५२३८८९ | ३००० |
२००७-०८ | १८६७०६ | ३७६० |
२००८-०९ | ४३९५८० | ५४६९ |
२००९-१० | ३८९४३० | ८६१२ |
२०१०-११ | ४९५७८९ | १२८०० |
२०११-१२ | ७२४४८५ | ७२९१ |
२०१२-१३ | ७७१९४३ | ५८३४ |
२०१३-१४ | ५५७६०७ | ६५४० |
२०१४-१५ | ६०६२०७ | ७६१९ |
२०१५-१६ | ७७४२६२ | ९६७८ |
२०१६-१७ | ५१४१८६ | ९४४४ |
२०१७-१८ | ११३२१५८ | ८७३८ |
२०१८-१९ | ९३१२७३ | ८०३४ |
२०१९-२० | ९८५७५० | ७७८८ |
२०२०-२१ | १६२०१२१ | ८३३९ |
२०२१-२२ | १९१३४३५ | ८३३९ |
२०२२-२३ | १४७४१३९ | ८३५३ |
२०२३-२४ | ११६१३२५ | १२८२९ |
२०२४-२५ | ७४०२३९ | १६००८ |
५० % आवक घटली
• सांगली मार्केट यार्डाच्या बाजारपेठ विश्वासार्हतेवर चालू आहे. येथील शेतीमाल विक्री झाल्यानंतर योग्य भाव आणि खात्रीशीर पैसे मिळत असल्यामुळे नांदेड, लातूर, हिंगोलीसह विविध जिल्ह्यासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणात हळद विक्री झाली होती.
• २०११-१२ ते २०२३-२४ पर्यंत दरवर्षी तीन ते चार लाख क्विंटल पोती हळदीची आवक होत होती. यावर्षी २०२४-२५ या आर्थिक वर्षात परपेठ हळदीची आवक ५० टक्के कमी होऊन केवळ १ हजार ७७ हजार ६९ क्विंटल पोती हळदीची आवक झाली आहे.
• प्रती क्विंटल दर सरासरी १३ हजार ६ ६२६ रुपये रुपये मिळाला आहे. तरीही ५० टक्के आवक का कमी झाली, याच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे.
हेही वाचा : नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार