अलिबाग: सद्या जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी परतीच्या पावसामुळे काढणीचे कामे लांबली आहेत. सद्या भात खरेदी-विक्री केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
मात्र भात उत्पादकांत निरुत्साह आहे. शासनाने जाहीर केलेला दोन हजार तीनशेचा हमीभाव परवडत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने यावर्षी भाताला दोन हजार तीनशे हमीभाव जाहीर केला आहे.
गेल्या वर्षी २,१८३ इतका होता. यात ११७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र वाढती महागाई व उत्पादनाचा खर्च पाहता हमीभावात भात विक्री कशी परवडणार असा सवाल रायगडमधील भात उत्पादक शेतकरी करीत आहेत.
अशी होणार भाताची खरेदी
मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यात २८ भात खरेदी-विक्री केंद्रांना परवानग्या मागवण्यात आल्या आहेत. आणखी आठ केंद्रांना मंजुरीचे प्रस्ताव आहेत. भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही मात्र यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. किमान आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रती क्विंटल दोन हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यात 'अ' दर्जाच्या भाताला २० रुपयांचा फरक असणार आहे.
गेल्या वर्षीची आकडेवारी
• गेल्या वर्षी हमीभाव : २,१८३
• गेल्या वर्षी भात विक्री: ५१ हजार क्विंटल
• यावर्षी हमीभाव : २,३००
• भात खरेदी-विक्री केंद्रे : २८
• अ दर्जासाठी वाढीव २० रुपये
खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश शासनाकडून अद्याप प्राप्त झाले आहेत. पुढील काही दिवसांत जीआर निघेल त्यानुसार विक्रीसाठी पाठवलेल्या भाताची आर्द्रता किती असावी, वाहतूक, विक्री पद्धत यासंदर्भातील माहिती सहकारी संस्थांना देण्यात येईल. - के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी
यंदा फक्त ११७ रुपयांचा वाढीव हमीभाव जाहीर झाला आहे. ही वाढ अत्यल्प आहे. शासनाने हमी भावाचा फेरविचार करायला हवा. दरवर्षी शेती करणे अवघड होत चालले आहे. यावर्षी सुरुवातीचा पाऊस लांबल्याने भाताला अपेक्षित फुटवे न आल्यामुळे तसेच शेवटी परतीच्या पावसाने उत्पादनता घट होण्याचा धोका आहे. त्यामुळे दरवाढ गरजेची आहे. - नंदू सोडवे, शेतकरी
अधिक वाचा: Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनचे भाव वाढले; हमी भावाने खरेदी सुरू