Dhan Kharedi :
रामटेक : हलक्या (अर्ली व्हेरायटी) धानाच्या पिकाची कापणी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या रविवार (१० नोव्हेंबर) पासून रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान खरेदीला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सचिन किरपान व सचिव हनुमंता महाजन यांनी संयुक्तरीत्या दिली.
रामटेक तालुक्यात हलक्या आणि भारी (लेट व्हेरायटी) या दोन वाणांच्या धानाची रोवणी केली जाते. भारी धानाच्या पिकाच्या कापणीला आणि तो धान बाजारात यायला वेळ आहे. मात्र, हलक्या धानाच्या पिकाच्या कापणीला सुरुवात झाली असून, शेतकरी मळणीदेखील करीत आहेत.
या धानाला योग्य दर मिळावा, मोजमाप योग्य व्हावे आणि संबंधित शेतकऱ्यांना वेळेवर चुकारे मिळावे, यासाठी बाजार समितीच्या आवारात येत्या रविवारपासून धान खरेदीला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती हनुमंता महाजन यांनी दिली.या धान खरेदीची बोली प्रत्येक सोमवार, बुधवार व शनिवारी सकाळी अकरा वाजता होणार असून, कडधान्याची बोली रविवार व गुरुवारी सकाळी अकरा वाजता होईल.संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी धानासह त्यांचा शेतमाल बाजार समितीच्या आवारात विकायला आणावा, असे आवाहन सचिव हनुमंता महाजन यांनी केले आहे.