Join us

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू उत्पादकांची निराशा! जाणून घ्या बाजारातील दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 7:04 PM

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ६ हजार ७३९ क्विंटल फुलांची आवक झाली. येथे किमान ८०० ते कमाल ३००० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

दसऱ्याच्या मुहूर्तामुळे आज बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या मालाची स्वत: रस्त्यावर किंवा बाजारात बसून किरकोळ विक्री करताना दिसत आहेत. सणासुदीच्या मुहूर्तावर मागणी असली तरी यंदा मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी दर आहेत. पुणे,नाशिक, मुंबईसारख्या शहरात ८० ते १२० रूपये प्रतिकिलो या दराने व्यापाऱ्यांकडून झेंडूची विक्री केली जात आहे. 

आज सायंकाळी मोठ्या प्रमाणावर आवक आवक होण्याची शक्यता असून उद्या दुपारनंतर दर कमी होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या दिवशी दुपारनंतर विक्रेत्यांना कमी दरात झेंडू विक्री करावा लागतो, त्यामुळे सकाळच्या सत्रात झेंडूचे दर ग्राहकांसाठी तेजीत असणार आहेत. सध्या ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून फुले खरेदी केले तर ४० ते ८० रूपये एक किलोप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. तर व्यापाऱ्यांकडून किंवा विक्रेत्यांकडून खरेदी केले तर ८० ते १२० रूपये मोजावे लागणार आहेत. उद्या दुपारनंतर फुलांचे दर कमी होऊन ३० ते ४० रूपये किलोपर्यंत येण्याची शक्यता आहे. 

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ६ हजार ७३९ क्विंटल फुलांची आवक झाली. येथे किमान ८०० ते कमाल ३००० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर पुणे बाजार समितीमध्ये १ हजार ७६२ क्विंटल आवक झाली असून किमान २ हजार ते कमाल ४ हजार रूपयांचा दर मिळाला आहे. जळगाव बाजार समितीमध्ये १६० क्विंटलची आवक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ १९०० रूपये तर पुणे बाजार समितीमध्ये ३००० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळत असल्यामुले यावर्षी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

उत्पादन वाढल्याने भाव पडलेपरतीच्या पावसाने धोका न दिल्यामुळे झेंडूचे चांगले उत्पादन यावर्षी झाले आहे. मागच्या वर्षी परतीच्या पावसाचा फटका झाल्यामुळे उत्पादन कमी झाले होते त्यामुळे चांगला दर मिळाला होता. तर यावर्षी उत्पादन वाढल्यामुळे दरही कमी झाले आहेत. पुणे बाजार समितीत मराठवाडा विदर्भातील वाशिम, हिंगोली, धाराशिवमधून शेतकऱ्यांनी फुले आणले आहेत. पण मनासारखा भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून थेट विक्रीनाशिकमध्ये आज ४०० ते ५०० वाहने फुलांची आवक झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी नाशिकच्या गोदाकाठी भरलेल्या बाजारात विक्री केली. यावेळी शेतकऱ्यांना ३० ते ३८ रूपये प्रतिकिलो याप्रमाणे दर मिळाला. तर लासलगाव येथील खानगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना केवळ १ हजार ते १२०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड