नाशिक : दिवाळी सणामुळे (Diwali Festival) पुढील आठवडाभर बाजार समित्यांना सुट्टया असल्याने तसेच परतीच्या पावसामुळे शेतात बाधीत झाला कांदा जास्त दिवस टिकणार नसल्याने परिसरात एकमेव सुरू असलेल्या खारीफाटा (ता. देवळा) येथील रामेश्वर कृषी मार्केटात (Rameshwer Krushi Market) सोमवार नवीन लाल कांद्याची प्रचंड आवक झाली होती.
मागील पावसात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या व काढणीला आलेल्या लाल कांद्याचे (Red Onion damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतातील लाल कांदा काढणीला वेग आला आहे. परंतु हा कांदा अती पावसामुळे बाधित होऊन अपरिपक्व असल्याने हा कांदा जास्त दिवस टिकणार नाही. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या आल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण होणार होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांनाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी खारीफाटा येथील रामेश्वर कृषी मार्केट आजही सुरू ठेवण्यात आले आहे. परिणामी मार्केटमध्ये नवीन लाल कांदा आवकेत दुपटीने वाढ झाली (Onion Arrival) होती.
लाल कांदा २५०० रुपये
आवारात नवीन लाल कांद्याची (Onion Market) ३२२ ट्रॅक्टर, २४५ पिकअप वाहनांतून सुमारे ६ हजार ५०० क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून, बाजारभाव किमान १८०० रुपये, कमाल ३५३६ रुपये तर सरासरी २५०० रुपये दराने लाल कांद्याची विक्री झाली. लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत असतानाच उन्हाळी कांद्याची आवक टिकून आहे. मार्केट यार्डात ५१० ट्रैक्टर, १८० पिकअप आदी वाहनांतून सुमारे १० हजार ८५० क्विंटल आवक झाली असून, बाजारभाव किमान १५०० रुपये, कमाल ५ हजार २५२ रुपये तर सरासरी ४२०० रुपये दराने उन्हाळी कांदा खरेदी केला.
चालू हंगामात शेतकऱ्यांनी नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु परतीच्या पावसामुळे या कांद्याचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत शेतातून जो कांदा निघत आहे, त्याची विक्री व्हावी व शेतकऱ्याना दोन पैसे मिळावे, यासाठी मार्केट प्रशासनाने सोमवारी व मंगळवारीही लिलाव सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- श्रीपाल ओस्तवाल, मुख्य संचालक, रामेश्वर मार्केट