सांगली : ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील किराणा मालाच्या वस्तूंनी महागाईचा कळस गाठला आहे. डाळी, तेलांच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेल, शेंगदाणे, चणाडाळ यांच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले असून, ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईने चिंता वाढली आहे.
गणेशोत्सव संपून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात उपवासाचे पदार्थ, विविध प्रकारचे मिष्टान्न बनविण्यासाठी किराणा मालाच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली होती; तसेच केंद्र शासनाने आयात शुल्क १२.५ वरून ३२.५ टक्के केले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ऐन दिवाळी सणाच्या पूर्वीच साखर, तेल, रवा, बेसन, खारीक, खोबरे, साबुदाणा, शेंगदाणे अशा विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे.
खाद्यतेल, खोबरे, नारळ, चणाडाळ, बेसन, पोहे यांच्या किमतींत सरासरी १० ते १५ टक्के दरवाढ झाली आहे. यामुळे सणासुदीत महागाईच्या डाटक्याने बजेट कोलमडले आहे
खाद्यतेलाचे प्रकार (दर प्रतिकिलो)
शेंगदाणा तेल | १७५ |
सोयाबीन तेल | १४४ |
सूर्यफूल तेल | १४६ |
सरकी तेल | १४८ |
आयात शुक्ल वाढल्याने तेलाच्या दरात वाढ
ऐन सणासुदीच्या काळात १४ सप्टेंबरपासून आयात शुल्क १२.५ वरून ३२.५ करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम किराणा मालाच्या वस्तूंवर होत आहे. सणासुदीच्या काळात हे आयात शुल्क कमी करावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
डाळींचे प्रकार (दर प्रतिकिलो)
हरभरा डाळ | ११० |
मटकी डाळ | १२० |
तूर डाळ | १८० |
मूग डाळ | १२० |
मसूर डाळ | १०० |
छोले | १५५ |
वाटाणा | १७० |
खाद्यतेलाचे दर अजून वाढण्याची शक्यता
किराणा मालाचे दर रोजच वाढत आहेत. श्रीमंतांपासून गरिबांची मागणी किराणा मालाला असते. खाद्यतेलाचे दर अजून वाढण्याची शक्यता असून, डाळींच्या दरातही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. - महेश शिंदे, किराणा दुकानदार.