साहिल शहा
कोरेगाव : कोणत्याही परिस्थितीत शुक्रवार, दि. १९ पासून आल्याचे सौदे सरसकट केले जाणार आहेत. शेतकरी अथवा व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण देऊन आल्याचे प्रतवारीनुसार वेगवेगळे सौदे घेऊ नयेत.
असे प्रकार आढळल्यास, होणाऱ्या परिणामास सर्वस्वी ते जबाबदार राहतील, असा इशारा सातारा जिल्हा आले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशशेठ जाधव, शेतकरी प्रतिनिधी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे यांनी संयुक्तपणे दिला आहे.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पत्रकाराने बाजार समितीच्या गीताई मंगल कार्यालयात गेल्या पंधरवड्यात झालेल्या बैठकीमध्ये १८ जुलैपर्यंत प्रतवारीनुसार आले खरेदी विक्रीस काहीअंशी परवानगी देण्यात आली होती.
जे शेतकरी अडचणीत आहेत, ज्यांची पिके अडचणी आहेत, त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून ही भूमिका होती. मात्र, आता राज्य सरकारने सरसकट आले खरेदी विक्रीचा निर्णय घेतला आहे तसे रितसर आदेश काढले असून शेतकरी आणि आले व्यापारीदेखील त्या निर्णयाशी सहमत आहेत.
त्यामुळे दि. १९ जुलैपासून सरसकट आले खरेदी विक्री केली जाणार आहे. कोणी जाणीवपूर्वक अथवा लपून-छपून प्रतवारीनुसार आले खरेदी विक्रीचा प्रकार केल्यास विविध शेतकरी संघटना, शेतकरी व व्यापारी असोसिएशन कारवाई करणार आहेत. त्यातून होणाऱ्या परिणामास प्रतवारीनुसार खरेती विक्री करणारे जबाबदार राहतील, असा इशारा सुरेशशेठ जाधव यांच्यासह दिनेश बर्गे व अमरसिंह बर्गे यांनी दिला आहे.
कोरेगाव बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले, त्यांचे संचालक मंडळ व सचिव संताजी यादव हेदेखील संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयाशी आणि राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत आहे. बाजार समितीही आता कठोर पावले उचलणार आहे, असे तिघांनी स्पष्ट केले.
तर गनिमी काव्याने कारवाई
आले व्यापाऱ्यांनी कोणतेही कारणे देऊन वेगवेगळे सौदे करू नयेत. आले उत्पादक शेतकऱ्यांनीही तात्पुरता विचार करून वेगवेगळा माल देऊन भविष्याचे नुकसान करून घेऊ नये. आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने अथवा शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने कोणत्याही व्यापाऱ्याने सरसकट आले खरेदी केले नाही तर गनिमी काव्याने कारवाई केली जाईल आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीस शेतकऱ्यासह संबंधित व्यापारी जबाबदार राहतील, असा इशारा दिनेश बर्गे व अमरसिंह बर्गे यांनी दिला आहे.