Join us

Nafed Onion: नाफेडचा कांदा आणि भाव पडण्याच्या अफवांवर विश्वास नको, गणेशोत्सवातही कांदा भाव टिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:48 PM

Nafed Onion Procurement: नाफेडचा कांदा बाजारात आल्याच्या अफवा असून सध्या तरी नाशिक किंवा महाराष्ट्रातील बाजारात नाफेडचा कांदा बाजारात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव पडण्याची भीती न बाळगता, एकदम कांदा विक्रीला न आणण्याची गरज आहे. जाणून घेऊ सविस्तर

Nafed Onion Procurement: नाफेडचा कांदा नाशिकच्या स्थानिक बाजारात आला असून त्यामुळे कांदाबाजारभाव पडले असल्याच्या अफवा समाज माध्यमांसह काही माध्यमांतून प्रसिद्ध होत असल्या, तरी नाफेडचा कांदा अजून स्थानिकच काय देशातही कोणत्याच बाजारात आलेला नसल्याचे नाफेडच्या सुत्रांनी सांगितले. दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवून आपल्याकडील कांदा एकदम बाजारात न आणण्याचे आवाहन कांदा उत्पादकांच्या संघटनांनी केले आहे.

दरम्यान नाफेडने ‘मूल्य स्थिरीकरण योजने’ अंतर्गत आडत्यांच्या माध्यमातून बफर स्टॉक बाजारात आणण्याचे ठरवले असून तशा निविदाही २ आणि ३ सप्टेंबर रोजी नाफेडच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यातील माहितीनुसार नाफेडचा कांदा देशातील विविध राज्यांत पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

गेल्या दोन दिवसांपासून काही माध्यमांसह, समाजमाध्यमांमध्ये नाफेडचा कांदा बाजारात दाखल झाल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. त्यामुळे भाव पडण्याच्या भीतीने कांदा उत्पादक धास्तावला आहे. काही ठिकाणी लासलगाव, निफाडच्या बाजारांत नाफेडचा बफर स्टॉकचा कांदा आल्याच्याही अफवा पसरविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाफेडचे संचालक केदा आहेर यांच्याशी ‘लोकमत ॲग्रो’ ने संपर्क साधला असता, त्यांनी नाफेडने असा कोणताही कांदा बाजारात, त्यातही नाशिकच्या बाजारात आणलेला नसून शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा स्थानिक बाजारात विक्री केला जात नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.गणेशोत्सवापर्यंत भाव टिकतील कारण...नाफेडच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निविदांनुसार नाफेडला, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना, तमिळनाडू, हरियाणा, पंजाब, जम्मू कश्मीर, चंडीगड, आसाम आणि पूर्वेकडील राज्ये, केरळ यासारख्या ठिकाणी या कांद्याची विक्री होणार आहे.  याशिवाय महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती या ठिकाणाहून आडते किंवा ब्रोकर यांच्याकडून बफर स्टॉकमधील कांद्याच्या व्यवहारासाठी निविदा मागिवल्या आहेत. या निविदातील अटी शर्तींनुसार नाफेडकडून नेमलेल्या आडतदारांनी बफर स्टॉकचा कांदा नाफेडने निर्देशित केलेल्या देशातील विविध बाजारांत स्पर्धात्मक किंमतींना विकायचा आहे. कांदा व्यापाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार तसेच ग्राहक संरक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सध्या उत्तरेकडील राज्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये कांद्याचे भाव ५० रुपये किलोपेक्षा जास्त गेल्याने नाफेडचा कांदा या भागात विक्री होण्याची शक्यता आहे. तसेच या निविदा ९ सप्टेंबरपर्यंत उघडणार असून त्यानंतरच पुढील काही दिवसांनी कांदा बाजारात येऊ शकणार आहे. 

नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नाफेडकडून बफर स्टॉकच्या ६३ टक्के म्हणजेच केवळ सुमारे दीड लाख मे.टन कांदाच बाजारात येणार असून तोही देशातील विविध भागात दररोज ३० ते ४० ट्रक( सुमारे ७०० ते ८०० मे.टन) या प्रमाणात टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवात कांदा बाजारभाव टिकून राहतील किंवा किलोमागे दोन-पाच रुपयांपेक्षा जास्त भाव खाली येणार नाहीत असा होरा जाणकार कांदा व्यापाऱ्यांनी सांगितला आहे. दुसरीकडे टेंडर प्रक्रिया ९ सप्टेंबरला सुरू होणार असल्याने आणि त्यानंतरच वर्क ऑर्डर वगैरे निघणार असल्याचे शेतकऱ्यांनी कांदा बाजारभाव पडण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे कांदा बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भाव कसे पडले?काल दिनांक ३ सप्टेंबर रोजी लासलगाव, पिंपळगाव बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल ४००० पर्यंत पोहोचले मात्र दुपारनंतर हेच दर पुन्हा ३५ ते ३८ रुपयांपर्यंत घसरल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. रविवारच्या सुटीनंतर सोमवारी बाजारसमितीला पोळ्याची सुटी असल्याने मंगळवारी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केल्यानेही बाजारभाव २ ते ३ रुपयांनी घसरले. मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी ६० ते ७० हजार क्विंटल कांदा आवक दररोज होत होती. सुटीनंतर काल नाशिकच्या बाजारसमित्यांमध्ये ९१ हजार क्विंटल कांदा आवक झाल्याने त्याचा परिणाम बाजारभाव घसरण्यात झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

एकदम मालाची विक्री नकोकाल दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात मार्केटला कांद्याला चांगले दर मिळाले. दुपारच्या लिलावासाठी काही मार्केटला कांद्याची दुप्पट तिप्पट आवक झाली आणि दरात घसरण झाली.  कांदा दर टिकतील आणि अजून वाढतील फक्त शेतकऱ्यांनी एकाच दिवशी कांद्याची जास्त आवक वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कांदा उत्पादकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये.  केंद्र सरकारचा बफर स्टॉक म्हणजेच नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा थोडयाच दिवसांत बाजार येईलच,परंतु आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री सुरू ठेवा आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले दर मिळविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. -भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

टॅग्स :कांदाबाजारशेती क्षेत्र