Join us

बेदाण्याच्या दरात दुपटीने वाढ; एका दिवसात तीन कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 2:41 PM

मागील १५ दिवसांत बेदाणा दरात दुपटीने वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.२९) उच्चांकी ३०१ रुपयांचा दर मिळाला आहे. सरासरी दरही १७१ रुपये मिळत असल्याने द्राक्ष बागायतदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मागील वर्षभरात बेदाण्याच्या दरात मोठी घट झाली होती. शेतकरी चिंतेत होते. भावच वाढत नसल्याने ६५ टक्के शेतकऱ्यांनी माल कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवला होता. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाही १५० रुपयांचा दर होता.

मात्र, मागील १५ दिवसांत दरात दुपटीने वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.२९) उच्चांकी ३०१ रुपयांचा दर मिळाला आहे. सरासरी दरही १७१ रुपये मिळत असल्याने द्राक्ष बागायतदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाही बेदाणा लिलावाला सुरुवात झाली आहे. बेदाणा व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आलेली आहे. मागील ८ फेब्रुवारीपासून बेदाणा लिलावाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला दर १५० रुपयांपर्यंत मिळाला होता.

आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकरी सोमशंकर काशीनाथ हडलगी यांच्या ४५ बॉक्सला २०१ रुपयांचा दर मिळाला आहे. गुरुवारी त्यात आणखी वाढ झाली. मंद्रूप येथील अंबिका शिंगडगाव यांच्या २८ बॉक्सला तब्बल ३०१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला.

३१० टन आवक होती. त्यातील १८० टनांची विक्री झाली आहे. त्यातून ३ कोटी ७ लाख ८० हजारांची उलाढाल झाली आहे. मागील वर्षभरानंतर प्रथम दरात वाढल्याने यंदा बेदाण्याचा चांगले दिवस आल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्यामागील वर्षभरापासून बेदाण्याच्या दरात वाढ होत नव्हती. माल पडूनच होता. वैतागून शेतकरी द्राक्ष बागा वाढवत होते. अनेक शेतकऱ्यांना यंदा बागा काढून टाकल्या. कारण, बेदाणा निर्मितीसाठी खर्चही वाढला आहे. वर्षभर माल ठेवल्यानंतरही १५० रुपयांवर दर गेलेला नव्हता. आता दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. २५ टक्के माल कमी निघत आहे. हवामानातील बदलामुळे माल खराब होत आहे. चांगल्या मालाला आता कुठे भाव मिळत आहे. तासगाव, सांगलीपेक्षा अधिक दर सोलापुरात आहे. मागील वर्षभरापासून बेदाण्याला दर मिळत नव्हता. आता कुठे दर वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक उच्चांकी दर गुरुवारी सोलापुरात मिळाला आहे. - शिवानंद शिंगडगाव, आडत व्यापारी

टॅग्स :द्राक्षेशेतीसोलापूरबाजारमार्केट यार्डशेतकरी