प्रदीप पोतदार
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एसएस जातीच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे.
दर वर्षी १५० ते १८० असणारा दर यंदा २२० ते ३०० रुपये प्रति चार किलो पेटी असा दर मिळत आहे. मागील हंगामापेक्षा ६० ते १०० रुपये प्रति पेटी जादा दर मिळत आहेत. मात्र, आता द्राक्ष उत्पादन कमी राहिल्याने दर तेजीत आहेत.
यंदा बहुतांश द्राक्ष पट्टयात अति पाऊस झाल्यामुळे फळधारणेवर परिणाम झाला होता. ते द्राक्ष घड जोपासणे हे शेतकऱ्यांसाठी आव्हान होते. त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादन कमी असल्यामुळे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्ष दर तेजीत असल्याने त्याची गोडी अधिक वाढली आहे. द्राक्षांबरोबरच यंदा नव्या बेदाण्यालाही चांगला दर मिळत आहे.
रमजान महिना असल्याने द्राक्ष, इतर फळे, तसेच बेदाणा, ड्रायफ्रूट अशा पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. तासगाव सांगलीतून मुंबई, गोवासह मुस्लीम राष्ट्रांमध्ये बेदाणा पाठवला जातो. त्यामुळे बेदाणा दर वधारला आहे.
उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची मागणी वाढली आहे. द्राक्षाची किरकोळ विक्री ८० ते १०० रुपये किलो प्रमाणे होत आहे. मालाची प्रतवारी बघून कमीत कमी ६० ते १२० रु. असा दर आहे.
उन्हाळा वाढेल तसा हंगामाच्या शेवटी दराने थोडीफार उचल घेणार, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील आठवड्यात चंद्रकात धोंडिराम नागजे यांच्या अनुष्का जातीच्या द्राक्षांना २९० रुपये प्रतिपेटी असा दर मिळाला.
सध्या द्राक्षांचा सध्याचा दर १८० ते ३०० प्रति चार किलो पेटी आहे, तर मागील हंगामातील दर १०० ते १६० प्रति चार किलो पेटी असा होता. या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
काळ्या द्राक्षांना अधिक पसंती
- जिल्ह्यातील वाळवा, पलूस, विटा, तासगाव भागात काळ्या जातीच्या कृष्णा व ज्योती या व्हरायटी द्राक्षांची लागवड केली जाते.
- यंदा काळ्या रंगाच्या द्राक्षांचे क्षेत्र कमी आहे.
- काळ्या द्राक्षांचे दर ४०० ते ४५० प्रती चार किलो पेटी असा सुरू आहे.
- बाजारपेठेत ग्राहकांकडून अशा द्राक्षांना अधिक पसंती आहे.
अधिक वाचा: Hapus Mango Market : वाशी बाजार समितीत हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्यांची आवक; कसा मिळतोय दर?