Join us

Draksh Bajar Bhav : ऐन दिवाळीत या शेतकऱ्याची द्राक्षे बाजारात दाखल कसा मिळाला पेटीला दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 1:24 PM

कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे.

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रगतशील शेतकरी जयसिंग सरवदे यांनी १० जुलै रोजी छाटणी केलेली माणिक चमन जातीची द्राक्षे सध्या बाजारात आली आहेत.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील व्यापाऱ्याने ४१३ रुपये प्रतिपेटी (चार किलो) दराने खरेदी केली आहे. सुमारे २,५०० पेटी द्राक्षे वाराणसीला पाठविण्यात आली आहेत.

सरवदे म्हणाले, वातावरणातील सततच्या बदलाचा फटका यापूर्वी अनेकदा बसला आहे. तरीही या वर्षी धाडसाने जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतली. छाटणीनंतर ११४ दिवस पाऊस सुरू होता.

ढगाळ हवामान दररोजच होते. तरीही परिश्रमपूर्वक बाग जगवली. त्याची चांगली फळे मिळत आहेत. बागेच्या कामात पत्नी सुवर्णा सरवदे हिने पाठबळ दिले. सणासुदीच्या काळात द्राक्षे बाजारात दाखल झाली असून दरही चांगला मिळत आहे.

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डसांगलीशेतकरीशेतीहवामानपीकफळे