Drumstick Benefits : सध्या गुलाबी थंडी... ढाब्यावर शेवगा फ्राय, शेवगा हंडी आणि बाजरीची भाकरीचा गरमागरम बेत म्हणजे पर्वणीच, पण शहराच्या आसपासच्या ढाब्यावरून 'शेवगा हंडी' गायब झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
'आमच्याकडे शेवगा हंडी सध्या मिळणार नाही,' असे ढाबेवाले सांगत आहेत. मोठ्या उत्साहाने ढाब्यावर गेलेल्या खवय्यांना असे उत्तर मिळत असल्याने त्यांचा मोठा हिरमोड होत आहे. जास्त पैसे मोजायला खवय्ये तयार आहेत, पण ढाब्यावर शेवगा हंडी मिळणे कठीण झाले आहे.
शेवग्याच्या शेंगा झाल्या दुर्मीळ
शेवग्याच्या शेंगा सध्या दुर्मीळ झाल्या आहेत. भाजी मंडईत त्या कमीच दिसत आहेत. रस्त्यावर, हातगाडीवरून, भाजी विक्रेत्यांकडून शेंगा गायबच झाल्या आहेत.
शेवग्याची पाने ही आरोग्यदायी
शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने शरीरात अनेक चांगले बदल होतात. शारिरिक व्याधींपासून सुटका मिळण्यास मदत मिळते.दररोज सकाळी शेवग्याची पाने चघळल्याने तुम्हाला शरीरातील अनेक आजारांपासून सुटका होते. शेवग्याच्या पानांच्या भाजीचे देखील फायदे आहेत. परंतू शेवग्याची पाने कच्ची चावून खाल्ल्याने माणसाच्या शरीरात चांगले बदल होतात.
हे आहेत फायदे
* शेवग्यांच्या पानात विटामिन्स ए, सी, ई, आणि बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. नियमित सेवनाने आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात आणि आरोग्य चांगले रहाते.
* शेवग्याच्या पानात रोग प्रतिकारक क्षमता वाढण्याची शक्ती असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
* शेवग्याची पाने सकाळी उपाशी पोटी चावून खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण राहाण्यास मदत मिळते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
* शेवग्याच्या पानात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनयंत्रणा देखील चांगली रहाते. यामुळे बद्धकोष्ठता देखील दूर रहाते, अन्य पचनासंदर्भातील आजारही दूर होतात.
* या पानात विटामिन्स ए आणि ई चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले होते. त्वचेवर येणाऱ्या सुरुकत्या कमी होण्याचे मदत मिळते.
शेवग्याच्या शेंगा ५०० रुपये किलो
सध्या भाजीमंडईत शेवग्याच्या शेंगा ४०० ते ५०० रुपये किलोदरम्यान विक्री होत आहेत. कारण हिवाळ्यात शेंगाचा हंगाम नसतो. त्यामुळे आवक कमी होते, पण याच थंडीच्या दिवसात शेवग्याच्या शेंगाला प्रचंड मागणी असते. - संजय वाघमारे, विक्रेता.
कोवळ्या शेंगांना चव नाही
नेमके थंडीत शेवग्याच्या शेंगा मिळत नाहीत. भाववाढीमुळे कोवळ्या शेंगा बाजारात आणून शेतकरी विकत आहेत. या कोवळ्या शेंगांची भाजी चवदार लागत नाही. एरव्ही ५५० रुपयांना शेवग्याची हंडी आम्ही देतो व बाजारात ५०० रुपये किलो शेवगा मिळत असल्याने परवडत नाही. कोणी मागितली, तर आम्ही शेवगा आणून हंडी देऊ, पण आता हंडीसाठी ७०० रुपयांवर रक्कम मोजावी लागेल. - गणेश तेलोरे, रेस्टॉरंट मालक
भाजी मंडईतच नाही, तर देणार कुठून?
भाजी मंडईत शेवगा शेंगा मिळत नाहीत. तुरळक ठिकाणी दिसतात, पण ते बेभाव सांगत आहेत. यामुळे देणार कुठून? आम्ही ग्राहकांना सरळ 'नाही' असे स्पष्ट सांगतो. महिन्याभरानंतर भाव कमी होतील, तेव्हा शेवग्याची हंडी देणे सुरू करू. - रमेश गायकवाड, ढाब्याचे मालक