दिवाळीच्या काळात मिठाईसोबत काजू-बदाम-पिस्ते-अक्रोड आदी सुकामेव्याला मोठी मागणी असते. परंतु, यंदा पुरवठा कमी झाल्याने काजू-बदामाच्या किमती कडाडू लागल्या आहेत. काजूची आयात ३५ टक्के घटल्याने दर वाढत आहेत. किरकोळ विक्री तरी चढत्या दरांमुळे ग्राहकांचा खिशाला झळ बसू लागली आहे.
दिल्लीच्या घाऊक बाजारात बदाम ६९० ते ७२१ रुपये प्रति किलोने मिळत आहेत. काजू ८०० रुपये, तर तुकडा काजू ७०० ते ७५० रुपये प्रतिकिलो आहेत. चिलीचा अख्खा अक्रोड ५११ ते ५३१ रुपये किलोने विकला जात आहे. कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी लागणाऱ्या सुका मेव्याची विक्री आधीच झाली असल्याने ड्रायफ्रूटच्या घाऊक बाजारात गर्दी कमी झाली आहे.
काजू : किरकोळ दर ४०० रुपयांनी अधिक
भारतात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांमधून काजूची आयात करावी लागते. काजू उद्योगाशी संबंधित व्यापाऱ्यांनी सांगितले की, यंदा काजूची आवक ३५ टक्के घटल्याने घाऊक बाजारात काजू १५० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांपर्यंत पोहचता पोहचता भाव ४०० रुपयांपर्यंत वाढतो.
बदाम : आणखी विलंबाने
■ बदामाची आयात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण, दक्षिण आफ्रिका आदी देशांमधून होते. ताज्या बदामाची खेप सध्या बाजारात आलेली नाही.
■ उत्पादन काढणे सुरू असून माल बंदरात पोहचण्यास २८ ते २९ ऑक्टोबर उजाडेल. क्लिअरन्स प्रक्रियेत आठवडा जाईल, दिवाळी नंतरच बदाम भारतात दाखल होतील.
अक्रोड : दर चढेच राहणार
■ अमेरिका आणि चिलीमधून अक्रोडची आयात होते. चिलीतून येणाऱ्या उत्पादन संपले आहे,
■ सहा महिने अमेरिकेच्या अक्रोडची आयात केली जाईल. आता ५ लाख ९० हजार टन इतका अक्रोड येण्याचा अंदाज आहे. आधीचा अंदाज ६ लाख ७० हजार टनांचा होता. आयात घटल्याने अक्रोडचे दर चढे राहतील.