शरद मिरे
भिवापूर : तिखट पण चविष्ट अशा जगप्रसिद्ध भिवापुरी मिरचीमुळे भिवापूर बाजार समितीचे मार्केट यार्डसुद्धा प्रसिद्ध आहे. (Dry Red Chilli Market) मार्केट यार्डात बाराही महिने वाळल्या मिरचीची आवक सुरू असते.
मात्र, शुक्रवारच्या (२१ मार्च) रोजी मार्केटने यावर्षीचे सर्व 'रेकॉर्ड ब्रेक' (Record-breaking) केले. कारण एकाच दिवशी अंदाजे १२०० क्विंटलवर वाळल्या मिरचीची आवक आली. (Dry Red Chilli Market) केवळ मार्केट यार्डातच नव्हे तर राष्ट्रीय मार्गावरसुद्धा आवक आणि गर्दीचे प्रतिबिंब दिसत होते.
भिवापूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात बाराही महिने दर शुक्रवारला वाळल्या मिरचीचे मार्केट असते. काही मिरची उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील हिरव्या मिरचीचा तोडा एजंटमार्फत बाहेर राज्यात विक्रीला पाठवत असल्यामुळे मार्केट यार्डात वाळल्या मिरची आवक (Dry Red Chilli Arrivals) दिवसेंदिवस कमी होत आहे.
यावर्षी मात्र मागील २८ फेब्रुवारी व ७ मार्चला शुक्रवारच्या मार्केटमध्ये अनुक्रमे ६०० ते ७०० क्विंटलवर वाळल्या मिरचीची आवक होती तर भाव अनुक्रमे ९० ते १३० रुपये किलो व १०० ते १४० रुपये किलोपर्यंत होता.
शुक्रवार (२१ मार्च) रोजी मार्केटमध्ये भावात घसरण झाली. ६० रुपयांपासून तर ११५ रुपये किलोपर्यंत भाव मिळाला. यार्डात वाळल्या मिरचीची प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक होती. ही आवक अंदाजे १२०० क्विंटलच्यावर असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. वाळल्या मिरचीची आवक वाढल्यामुळे मार्केट यार्डात पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती.
राष्ट्रीय मार्गावर वाहनांची रांग
शुक्रवार (२१ मार्च) हा दिवस वाळल्या मिरचीचा मार्केट दिवस असल्यामुळे बाजार समितीच्या मार्केट यार्डात सकाळपासून वाळल्या मिरचीची आवक सुरू झाली होती. आवक एवढी वाढली की, मार्केट यार्डात पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती?
शेतकऱ्यांसोबतच बैलबंडी, ट्रॅक्टर, मालवाहू वाहनांच्या गर्दीने मार्केट यार्ड फुल्ल झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय मार्गावरील तहसील कार्यालयापासून तर मार्केट यार्डापर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
आजच्या बाजारात वाळल्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होती. मात्र, भाव मिळाला नाही. मागच्या वर्षी चांगल्या दर्जाच्या वाळल्या मिरचीला २०० रुपये तर मध्यम दर्जाच्या मिरचीला १५० रुपये किलोपर्यंत भाव होता. यावर्षी हाच भाव १०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यावर्षी मिरचीवर विविध रोगांनी हल्लाबोल केल्यामुळे शेतकऱ्यांना मिरचीचे उत्पादन महागात पडले. त्या तुलनेत भाव मात्र मिळालेला नाही. - सुजित अवचट, मिरची उत्पादक शेतकरी, रा. सेलोटी
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Bajar Bhav: बाजारात हरभऱ्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर