योगेश गुंड
केडगाव : मागील काही दिवसांपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीपाठोपाठ इतर भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांनी भावाचा उच्चांक गाठला आहे.
नगरमध्ये कोथिंबिरीची जुडी तब्बल १२० रुपयांना विकत आहे. कोथिंबिरीच्या भावाचा हा उच्चांक ठरला आहे. पावसामुळे माल खराब झाल्याने भाव वाढूनही शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच आहे.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विक्रीला आणलेल्या कोथिंबीर आणि मेथी मालाला रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर दुसरीकडे कोथिंबीर, मेथी जुडीचे भाव ऐकून सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
आवक घटली
सततच्या पाववसामुळे भाजीपाला खराब झाला. यामुळे बाजारातील आवक घटली. त्यातच सोमवारी बैलपोळ्याचा सण व पिठोरी अमावास्या असल्याने बाजार समितीत कमी प्रमाणात शेतमाल आला, परिणामी, भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले.
बाजार समितीत कोथिंबिरीला २४ हजारांचा भाव
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीची सोमवारी ११ क्विंटल आवक झाली. त्याला ५ हजार ४०० पासून २४ हजार रुपयांचा भाव मिळाला. सरासरी भाव १४ हजार ७०० इतका झाला.
भाजीपाल्याची शेती बिनभरवशाची आहे. त्यात कोथिंबिरीचे पीक नाजूक असते. यामुळे पावसाळ्यात जास्त कोणी कोथिंबिरीची लागवड करीत नाही. ज्यांनी लागवड केली होती त्यांच्या कोथिंबिरीचा पावसाने शेतात चिखल झाला. शेतकऱ्यांनाच खायला राहिली नाही, तर विक्रीसाठी कुठून आणायची. यामुळे भाव वाढून काही उपयोग झाला नाही. - रमेश ठोंबरे, शेतकरी
मी गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणतो. आजपर्यंतच्या इतिहासात मला पहिल्यांदाच कोथिंबीर जुडीला मोठा बाजारभाव मिळाला. - तुकाराम लांडगे, शेतकरी