लोकसभा निवडणूक, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, निर्यात बंदी, बाजारातील बेदाण्याची वाढलेली आवक यामुळे बेदाण्याचा दर कमी झाला आहे. सध्या १३० ते १५० रुपये इतका दर मिळत आहे. 'दुष्काळात धोंडा महिना' अशी स्थिती जत तालुक्यातील बेदाणा उत्पादकांची झाली आहे.
पाण्यासाठी केलेला खर्च, मशागतीचा खर्च, शीतगृहांचे भाडे वजा जाता द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. यावर्षी बेदाण्याला चांगला दर मिळेल, अशी भोळी-भाबडी आशा बाळगून होता.
उत्पादन वाढले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून बेदाण्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामाला अवकाळी पावसाचा अपवाद वगळता चांगले वातावरण होते. त्यामुळे बेदाणा उत्पादनात वाढ झाली.
वाढलेले उत्पादन दर कमी होण्यास कारणीभूत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. सुरुवातीला बेदाण्याचे दर २२१ रुपये प्रति किलो होते. त्यानंतर हळूहळू बेदाण्याची आवक वाढली. त्याचा परिणाम दरावर झाला. पार्श्वभूमीवर रमजान ईदच्या बेदाण्याच्या दारात वाढ झाली नाही.
सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहे. रस्त्यावर तपासणी नाके सुरू आहेत. व्यापाऱ्यांना पैसे आणताना, ऑनलाइन पेमेंट करताना अडचणी येतात. आर्थिक कटकटीमुळे व्यापारी येत नाहीत. तसेच अवकाळी पाऊस सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम निर्यातीवर झाला आहे.
त्यामुळे सातत्याने बेदाणा दर कमी होत आहे. बेदाण्याला अपेक्षित दर नसल्याने बेदाणा विक्रीस काढण्यास तयार नाहीत. आता बेदाण्याचे दर लोकसभा निवडणूक निकालानंतर वाढ होईल. त्यामुळे ४ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बेदाण्याचे दर प्रति किलो
सध्याचा दर | मागील दर | |
हिरवा बेदाणा | १३० ते १८० | २०० ते २२५ रु |
पिवळा बेदाणा | १४० ते १७० | १९५ ते २२० रु |
काळा बेदाणा | ४० ते ८० | ८० ते ११० रु |
उत्पादनात वाढ
राज्यात यंदा २ लाख ९० हजार टन उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षापेक्षा ३० हजार टन उत्पादनात वाढ झाली आहे.
दोन महिन्यांत ४० रुपयांपर्यंत दर कमी
बेदाण्याचा मार्च महिन्यात २२५ रुपये दर होता. दरात प्रत्येक वेळी २० ते ३० रुपयांनी घसरण झाली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडले आहे.
यंदाच्या बेदाणा हंगामावर दृष्टिक्षेप
• गुणवत्तापूर्ण बेदाणास १५० ते १९० रुपये प्रति किलो दर.
• आजपर्यंत ३० ते ३५ टक्के बेदाण्याची विक्री.
• जिल्ह्यातील शीतगृहात ६५ ते ७० टक्के बेदाणा शिल्लक.
बेदाण्याचे दर कमी होत आहे. कोल्ड स्टोअरेजचे भाडे पाण्यासाठी टँकरवर केलेला खर्च, वॉशिंग, प्रतवारी, बेदाणा निर्मिती, औषधे, रासायनिक खते, मशागतीचा खर्च वजा जाता सध्याचा दर अजिबात परवडत नाही; परंतु हंगामाचा खर्च करण्यासाठी बेदाणा विक्रीशिवाय पर्याय नाही. - बिराप्पा शिंदे, बेदाणा उत्पादक, सिद्धनाथ संचालक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती
अधिक वाचा: हा चिंच बाजार राज्यात अव्वल; येथील चिंचांना जगभरातून मागणी