Join us

दर नसल्याने वाहतूक खर्चही निघेना; कांदा बाजारात मंदीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:26 IST

Onion Market Update : नवीन कांदा बाजारात येत असल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी भाव ३०० ते ५०० रुपयांनी घसरल्याचे चित्र आहे. सध्या ९०० ते १२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

यंदा विहिरी आणि कूपनलिकांना चांगले पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली. आता नवीन कांदाबाजारात येत असल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी भाव ३०० ते ५०० रुपयांनी घसरल्याचे चित्र आहे. सध्या ९०० ते १२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

नंदुरबारबाजारात सध्या दररोज ७०० क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. बुधवारी तर वाहने उभी करण्यासाठीदेखील जागा नव्हती अशी स्थिती निर्माण झाली होती. नंदुरबार, नवापूर व लगतच्या साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील उत्पादित कांदा शेतकऱ्यांना इंदूर, अहमदाबाद, सुरत येथील बाजारात विक्रीसाठी न्यावा लागतो. काहीवेळा भाव नसल्यास वाहनभाडेदेखील निघणे जिकिरीचे ठरते.

त्यामुळे स्थानिक ठिकाणी कांदा मार्केट सुरू करावे अशा मागणीची दखल घेत नंदुरबार बाजार समितीने गेल्या वर्षापासून कांदा मार्केट सुरू केले आहे. सध्या आवक वाढली आहे. खरेदीदार व्यापारी चारच असल्याने लिलावाच्या वेळी मोठी कसरत करावी लागत आहे. 

भाव जास्त पण कधी वाहन भाडेही सुटत नाही...

• स्थानिक शेतकऱ्यांची इंदूर, अहमदाबाद मार्केटलादेखील चांगली पसंती आहे. त्या भागात किमान १०० ते जास्तीत जास्त ३०० रुपये भाव जास्त मिळतो. कांदा जास्त राहिल्यास किंवा मोठे शेतकरी तिकडे कांदा विक्रीसाठी नेतात.

• काही शेतकरी मात्र वाहन भाडे लागत असल्याने आणि वेळही दोन ते तीन दिवस लागत असल्याने तिकडे जाणे टाळून स्थानिक ठिकाणीच एका दिवसात कांदा विक्री करून मोकळे होतात.

• नंदुरबार तालुक्यासह नवापूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यांतील शेतकरी या ठिकाणी कांदा विक्रीसाठी आणत आहेत. साक्री तालुक्यात साक्री आणि पिंपळनेर मार्केटदेखील मोठे आहे. परंतु, भाव नंदुरबारला बऱ्यापैकी मिळत असल्याने शेतकऱ्यांची धाव इकडे राहत असल्याचे दिसून येते.

• स्थानिक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता गेल्या वर्षापासून नंदुरबार बाजार समितीने कांदा मार्केट सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे.

यंदा २५ हजार क्विंटल...

• नंदुरबार कांदा मार्केटमध्ये यंदाच्या सिझनमध्ये आतापर्यंत जवळपास आठ हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात आली आहे. कांदा सिझन आणखी दीड ते दोन महिने राहणार असल्याने यंदा किमान २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

• कांदा मार्केटला जागा नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील आरटीओ कार्यालयाच्या समोर खासगी जागेत मार्केट सुरू करण्यात आले आहे. लवकरच मार्केट बाजार समितीच्या स्वतःच्या जागेवर सुरू होणार असल्याने त्या संदर्भातील नियोजन सुरू आहे.

• कांदा मार्केटमध्ये दररोज ५०० ते ७०० क्विंटल आवक होत आहे. ३ किमान ६० ते ८० वाहने भरून येथे येत आहेत. काही वेळा वाहनांच्या संख्या वाढल्यावर त्या ठिकाणी वाहने लावण्यासाठीदेखील जागा राहत नसल्याची स्थिती राहत असते.

हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डनंदुरबारविदर्भशेतकरी