अरुण बारसकर
सोलापूर : रासायनिक, सेंद्रिय व इतर अनेक प्रकारची खते विकसित झाली असली तरी शेणखताचे महत्त्व काही कमी झालेले नाही. यावर्षी सव्वा ब्रासची एक ट्रॅक्टर टॉली कुठे अडीच, कुठे तीन, तर कुठे साडेतीन हजार रुपयांनी शेतकऱ्यांकडून विक्री झाला.
काही (साधारण २० वर्षे) वर्षांखाली बैलजोडीच्या साहाय्यावर शेती अवलंबून होती. त्यावेळी शेती ही शेणखत, शेळीच्या लेंड्या व गावखतावर अवलंबून होती. मात्र, मधल्या काळात इतर खतांचा वापर वाढला होता.
अलीकडे बरेच पडीक क्षेत्र पिकाखाली आल्याने खतांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे रासायनिक व इतर खतांवर जरी शेती अवलंबून असली तरी काही शेतकरी केवळ शेणखताचा वापर करीत आहेत. ग्रामीण भागात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जर्शी गाय व म्हशीचे शेणखत शेतीसाठी वापरले जाते.
शेळ्यांच्या लेंड्या खत तसेच गावखत आता मिळणे कठीण आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात अडीच ते साडे तीन हजार रुपयांनी सव्वा ब्रास खताची एक डंपिंग ट्रॉली विक्री होत होती. मागील तीन-चार वर्षांत एका डंपिंग ट्रॉलीचा भाग साधारण ४०० ते आठशे रुपयांनी वाढला असल्याचे सांगण्यात आले.
दोन.. अडीच.. साडेतीन..
यावर्षी जिल्ह्यातील बहुतेक तलाव कोरडे पडल्याने तलावातील गाळ उपसून शेतकऱ्यांनी जमिनीत टाकून घेतला आहे. पावसाअभावी मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिके गेली होती. त्यानंतर कडक उन्हाळा व पाण्याअभावी शेती ओसाड पडली होती. त्यातच तलावातील मातीसाठी खर्च केल्याने शेणखताला मागणी कमीच होती. तरीही शेणखताचे दर कमी झाले नाहीत, वाढलेही नाहीत.
मागील वर्षी साधारण दोन ते अडीच हजार रुपयाने एक डंपिंग ट्रॉली खत मिळत होते. त्यात यावर्षी थोडीशी वाढ झाली. तलावातील गाळ टाकून घेतल्याने शेणखत मागणीवर परिणाम झाला. दाक्ष, ढबू मिरची अशा पिकांसाठी शेणखत वापरले जाते. मागील वर्षी पाऊस नसल्याने शेणखताला मागणी कमी दिसली. - दीपक कदम, ट्रॅक्टर मालक
शेतीचे चांगले आरोग्य ठेवायचे काम शेणखत करते. जमिनीची भौतिक जडण-घडण शेणखत करते. शेणखत कुजल्यानंतर सर्व १६ प्रकारची अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात. जमिनीचा पोत सुधारण्याचे फार मोठे काम शेणखत करते. देशी गाईच्या शेणात कोट्यवधी जीवाणू तयार होतात. जीवाणूंची शेती गरजेची असून त्यासाठी शेणखत महत्त्वाचे आहे. रासायनिक खताचा इफेक्ट तात्पुरता होतो. रासायनिक खतामुळे जमीन नापीक होते. ते जमिनीसाठी धोकादायक आहे. जमिनीला आवश्यक १६ प्रकारची अन्नद्रव्ये शेणखतातून मिळतात. मात्र, या सर्व अन्नद्रव्यांसाठी वेगवेगळी रासायनिक खते घालावी लागतात. - अमोल शास्त्री, विशेषज्ञ कृषीविद्या, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर
आमच्या परिसरात ऊस व द्राक्ष बागांचे मोठे क्षेत्र आहे. द्राक्ष बागांसाठी शेणखताची गरज असते. त्यामुळे तीन ते साडेतीन हजार रुपयाला एक ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत मिळत होते. साधारण मागील तीन-चार वर्षांपासून हेच दर आहेत. - दीपक अवताडे, शेतकरी, विरवडे बु.
अधिक वाचा: आनंदाची बातमी; राज्यात १,२४५ महसूली मंडळांमध्ये चारा डेपो उघडण्यास मान्यता