शिरीष शिंदे
यंदा अक्षय्यतृतीया हा सण १० मे रोजी साजरा होणार असल्याने शहरातील बाजारपेठेत परराज्यांतील आंबे दाखल होऊ लागले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत समतुल्य दराने आंबे मिळत असल्याने खवय्यांची चांगलीच मौज होणार आहे. बीड शहरातील बाजारपेठेत मागच्या पाच ते सहा वर्षांपासून परराज्यांतील विविध जातींचे आंबे विक्रीसाठी दाखल होत आहेत.
बाहेर राज्यातील आंबे असतील तरी त्याच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर नसतात. त्यामुळे एक ग्राहक सहज दोन ते तीन किलो आंबे खरेदी करत असल्याचा अनुभव व्यापारी सांगत आहेत. प्रत्येक आंब्याची चव वेगवेगळी असल्याने वेगवेगळ्या प्रकारची आंबे खवय्यांसाठी एक प्रकारची मेजवानीच ठरत आहे. ऊन वाढत असल्याने आंब्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.
भाजीमंडईत आंबेच आंबे
■ बीड शहरातील भाजी मंडई भागात सध्या सगळीकडे आंबेच आंबे दिसून येऊ लागले आहेत.
■ बीड शहरातील काही विशिष्ट व्यापारी परराज्यांतील आंबे बीडमध्ये विक्रीसाठी आणत असले तर त्यांचे भाव इतर आंब्यांच्या तुलनेत कमीच असतात.
■ त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडतात.
अक्षय्यतृतीयेचा सण लांबणीवर असल्याने सध्या तरी आंब्यांचे दर स्थिर आहेत. या सणानंतर आंब्याची विक्री वाढत असते. मागच्या वर्षीप्रमाणेच सध्या भाव आहेत. सणानंतर त्यात वाढ अपेक्षित आहे. - बद्रीद्दोदीन खन्ना, आंबा व्यापारी, बीड
असे आहेत सध्या बाजारात आंब्यांचे दर
आंबा प्रकार | चालू भाव (प्रतिकिलो) | कोठून आला |
केशर | १५० ते २०० | चाकूर |
हापूस | १५० ते २०० | केरळ |
लालबाग | १२० | आंध्र प्रदेश |
मालगोबा | २०० | आंध्र प्रदेश |
दशेरी | १५०-२०० | गुजरात, आंध्र प्रदेश |
आम्रपाली | २५०-३०० | गुजरात |
लंगडा | १५०-२०० | गुजरात |
करंजा | २०० | गुजरात |
हूर | ३०० | नेकनूर (जि.बीड) |
मलेगा | १५०-२०० | गुजरात |
पायरी | १५० | आंध्रप्रदेश |
डाळिंब | १०० | गुजरात |
काला पहाड | १५० | आंध्रप्रदेश |
राजहंस | १५०-२०० | गुजरात |
बाहुबली | ३०० | गुजरात |
या राज्यांतून येतात आंबे
बीड शहरातील बाजारपेठेत गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांसह लातूर जिल्ह्यातील चाकूर, बीड तालुक्यातील नेकनूर या भागांतील आंबा विक्रीसाठी दरवर्षी दाखल होत आहे. वेगवेगळ्या जातीचे आंबे खव्य्याच्या पसंतीस उतरत आहे.
अक्षय्यतृतीयेचा सण एक महिना लांबणीवर
मागच्या वर्षी अक्षय्यतृतीयेचा सण २२ एप्रिल रोजी आला होता. यंदा हा सण १० मे रोजी साजरा होत आहे. या सणानंतर खऱ्या अर्थाने आंब्यांच्या किंमती वाढतात. यावेळी जवळपास एक महिना लांबणीवर हा सण गेला असल्याने आंब्याच्या किमतीत वाढ करण्यात आली नाही. आता वाढ केली तर त्याचा विक्रीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आंबे विक्रेत्यांनी अद्याप मागच्या वर्षीचेच दर कायम ठेवले आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.