Edible Oil :
संजय लव्हाडे /जालना :
पितृपक्ष असल्यामुळे बाजारात ग्राहकी कमी असले, तरी उत्साह चांगला आहे. बहुतांश वस्तुमालाच्या दरात तेजी आली असून, खोबरे, खोबरेल तेल नारळ, तसेच सोने-चांदीचे दर कमालीचे वाढले आहेत.
सणासुदीचे दिवस लक्षात घेता केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी साखरेचा कोटा २५ लाख ५० हजार टन जाहीर केला. मात्र, असे असले तरी साखरेच्या दरात तेजी कायम आहे.
राज्यातील बहुतांश भागांमध्ये नारळाची आवक ही दक्षिण भारतातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून होते. आवक कमी झाल्याने भाव अचानक वाढले. घाऊक बाजारातील नारळाचे दर पंचवीसशे ते तीन हजार रुपये शेकड्यापर्यंत पोहोचले आहेत.
१ ऑक्टोबरपासून हमीभावाने खरेदी
• सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात १३ लाख ८ हजार टन
सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याला केंद्राने परवानगी दिली आहे.
• हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, प्रत्यक्ष खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
• जुन्या सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे १०० ते २०० रुपये वाढले असले तरी नवीन सोयाबीनला केवळ ३ हजार २०० ते ३ हजार ८०० रुपये इतकाच भाव मिळत आहे. जुन्या सोयाबीनचे दर ४ हजार ४०० ते ४ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
आयात शुल्कात वाढ
• सरकारने आयात शुल्क २० टक्के इतके वाढवल्यामुळे सर्व खाद्यतेलांच्या दरात क्विंटल मागे एक हजार ते दोन हजार रुपयांची तेजी आली. सध्या पामतेल, सोयाबीन तेल, सरकी तेल प्रत्येकी १३ हजार ४००, सूर्यफूल तेल १३ हजार ५०० आणि करडी तेलाचे दर २१ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
• सणासुदीचे दिवस असल्याने सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी साखरेचा कोटा २५ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला. मात्र जाहीर केलेल्या कोट्यापेक्षा मागणी जास्त असल्याने साखरेच्या दरात क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांची तेजी आली. जालना बाजारपेठेत साखरेचे दर ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.