बदलत्या वातावरणाचा फटका आणि ग्राहकी नसल्याने मोठी आवक झालेल्या वांग्याचा भाव दोन महिन्यांतच कमालीचा घसरला, तर पपईलादेखील मातीमोल भाव मिळत आहे. बीड येथील भाजीपाला अडत बाजारात फळे आणि भाज्यांची आवक वाढली आहे; परंतु वांगी वगळता इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. तर टोमॅटोने पुन्हा उचल खाल्ली आहे.
चातुर्मासात वांग्यांना मागणी कमी होती; परंतु दिवाळीनंतर चंपाषष्ठीच्या वेळी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २० किलो वांग्याचे कॅरेट २००० रुपयांपर्यंत पोहोचले होते.
संक्रांतीनंतर वांग्याचा भाव घसरला
जानेवारीत संक्रांतीदरम्यान वांगीचे एक कॅरेट ८०० रुपयांना ठोक बाजारात विकले गेले. त्यामुळे किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये भाव होता. त्यानंतर मात्र १५ दिवसांतच एका कॅरेटमागे ७०० रुपयांची घसरण झाली.
दोन-तीन दिवसांपासून २० किलो वांग्याचे कॅरेट केवळ शंभर रुपयांना विकावे लागले. दोन महिन्यांत वांग्यांच्या दरात दोन वेळी एकूण १९०० रुपयांची घसरण झाल्याचे बागवान हुसेन जाफर यांनी सांगितले. त्यामुळे वांगी उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघाला नाही. तर किरकोळ भाव ४० ते ५० रुपये किलो होता. गावरान वांगी मात्र ८० रुपये किलो होते.
मेथी, कोथिंबिरीचा झाला पाला
■ ठोक बाजारात आवक वाढल्याने मेथी आणि कोथिंबिरीचा तोरा चांगलाच घसरला,
■ १०० ते १५० रुपये शेकडा जुडी मिळणाऱ्या मेथी जुडीचा भाव ५० रुपये शेकडा झाले, तर कोथिंबीर जुडीचा भाव १०० रुपये शेकडा होते.
■ परिणामी किरकोळ बाजारात दहा रुपयांना चार ते पाच जुडी मेथी, कोथिंबिरीच्या दहा रुपयांना तीन ते चार जुडी मिळत आहेत
पपई खा पपई, १५ ते २० रुपये किलो
- एकीकडे थंडी वाढत असताना बाजारात पपईची मोठ्या प्रमाणात आवक झाली. फळ उत्पादक शेतकऱ्यांनी तैवान व इतर जातीच्या संकरित तसेच गावरान पपईची लागवड केली.
- बाजारात एकाच वेळी आवक झाल्याने, तसेच वातावरणातील बदलामुळे मागणी कमी असल्याने महिनाभरापासून २० किलो पपईचे कॅरेट काही दिवस १५० रुपयांना विकले गेले. तर मागील १५ दिवसांत कॅरेटला शंभर रुपये भाव होता; मात्र उठाव कमी होता.
- आता उन्हाळ्याची चाहूल * लागल्याने पपई खाण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचे हाजी आशम बागवान यांनी सांगितले, किरकोळ बाजारात दर्जानुसार पपईचा भाव १५ ते २० रुपये किलो होता.