रबी अर्थातच उन्हाळी कांद्याचा हंगाम मार्चपासून सुरू झाला असून पुढील आठवड्यात म्हणजेच एप्रिलमध्ये उन्हाळी कांद्याचा हंगाम ऐन बहारात असणार आहे. त्यामुळे बाजारात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता असून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नाही, त्यांना बाजारभावातील चढ उताराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
या संदर्भात हॉर्टीकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशनने वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवले असून त्यात एप्रिलपासून निर्यात खुली करण्याचे आवाहन करण्याबरोबरच जागतिक कांदा बाजारातील परिस्थतीही नमूद केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी हे पत्र कांदा निर्यातदार संघटनेच्या वतीने दिले आहे.
बांगलादेशाकडून मागणी नसणार
पत्रात लिहिल्याप्रमाणे बांगलादेशात भारत सर्वाधिक म्हणजे १७ टक्के कांदा निर्यात करतो. मात्र भारताकडून कांदा निर्यात धोरणाच्या सततच्या धरसोड वृत्तीमुळे बांगला देशाने कांदा लागवड वाढविली असून त्यांच्या स्थानिक कांदा पिकाची आवक वाढू लागली आहे, त्यामुळे आगामी काळात बांगलादेशकडून मागणी कमी होईल.
पाकिस्तान करणार कांदा निर्यात
रमजान महिन्यानंतर १५ एप्रिलपासून पाकिस्तानमधील कांद्याच्या निर्यातीला मोफत परवानगी दिली जाण्याची शक्यता असून त्यांच्याकडील नवीन कांदा पिकाची आवक देखील याच काळात होणार असल्याने या देशाच्या कांद्याची इतर देशांना मागणी राहिल. त्याचा परिणाम आपल्या देशातील आगामी कांदा निर्यातीवर होऊ शकेल.
हेही वाचा: कांदा निर्यातबंदी उठणार का? सध्या निर्यातीत कसा घोटाळा होतोय? जाणून घ्या
इजिप्तमध्ये बंपर कांदा पीक
यंदा इजिप्तमध्ये कांद्याचे बंपर पीक आले असल्याचे सांगितले जात आहे. इजिप्त हा कांद्याच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक असून अनेकवेळा भारतानेही इजिप्तकडून कांदा आयात केलेला आहे. यंदा १५ एप्रिलपासून इजिप्तही कांदा निर्यात सुरू करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा कांदाही लवकरच जागतिक बाजारात दाखल होईल.
भारतीय कांद्यावर असा परिणाम
भारतातून उन्हाळी हंगामाच्या पहिल्या 4 महिन्यांत निर्यात सर्वाधिक असते. म्हणजे मार्च, एप्रिल या काळात निर्यात चांगली होते आणि मे पासून निर्यात सामान्यतः कमी कालावधीची असते. आपल्याकडे निवडणुक होईपर्यंत कांदा निर्यात बंद ठेवल्यास जूनपर्यंत म्हणजेच लोकसभा निकालाच्या काळापर्यंत कांदा निर्यातीचा हंगाम जवळपास संपण्याची शक्यता असते. यानंतर जरी निर्यातीला नव्या सरकारने परवानगी दिली, तरी त्याचा शेतकरी, व्यापारी, निर्यातदार किंवा केंद्र सरकार यांना काहीही फायदा होणार नाही अशी भीती निर्यातदार संघटनेने व्यक्त केली आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारताला कांदा निर्यातीतून चांगले परकीय चलन मिळण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिलपासून कांदा निर्यात सुरू करावी अशी विनंती निर्यातदारांची संघटना असलेल्या हॉर्टीकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशनने केली आहे. मात्र त्यावर सरकार सरकारात्मक निर्णय घेणार किंवा कसे? असा प्रश्न चांगल्या बाजारभावाची वाट पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही पडला आहे.