Lokmat Agro >बाजारहाट > इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा

इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा

Egypt banned onion export for three months will benefited onion prices in India | इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा

इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा

डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे  बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे  बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

स्थानिक बाजारपेठेतील किमतीत वाढ झाल्याने इजिप्तने कांद्याच्या निर्यातीवर तीन महिन्यांची बंदी घातली असल्याचे वृत्त आहे. एक ऑक्टोबरपासून पुढील तीन महिन्यांसाठी ही कांदा निर्यात बंदी लागू असेल. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित होत असून देशातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, असा दिलासा या क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. दुसरीकडे बाजारसमित्यांमध्ये उन्हाळ कांद्यासह नवीन येणाऱ्या लाल कांद्याला मिळणारे भाव डिसेंबर अखेरपर्यंत तरी टिकून राहणार असल्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. 

दरम्यान आज १६ नोव्हेबर रोजी सकाळच्या सत्रात पुणे बाजारसमितीत लोकल कांद्याला सरासरी ३५०० रुपये, कमीत कमी २५०० रुपये, तर जास्तीत जास्त ४५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

इजिप्तच्या कांदा निर्यातीबद्दल
कांदा उत्पादनात स्वयंपूर्ण असलेला देश दरवर्षी दहा लाख टन कांदा निर्यात करतो.  या देशात यंदा ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत 71% ची तीव्र वाढ झाली आणि विशेषतः भाज्यांच्या किमती जुलैमध्ये 5.5% वाढीच्या तुलनेत 24.4% वाढल्या. कांद्याचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने ऑगस्टमध्ये देशांतर्गत किमतीत वाढ झाल्यानंतर त्या वस्तूंवर ४०% निर्यात कर लादला, तर अलिकडेच कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० अमेरिकन डॉलर प्रति टन केली. जगातील कांदा निर्यातीत इजिप्तचा वाटा मोठा असून २०२२मध्ये जागतिक कांदा निर्यातीत इजिप्तचा वाटा ५.१ टक्के इतका होता. दरम्यान इजिप्तने घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे त्या देशातून भारतात कांदा आयात होण्याची शक्यता डिसेंबरपर्यंत तरी मावळली आहे. 

इजिप्तसह जागतिक स्थिती काय
यंदा खराब हवामानामुळे भारतासह युरोपातील शेतीलाही फटका बसला. कांदा पिकालाही त्याचा फटका बसल्याने अनेक कांदा उत्पादक देशांमध्ये कमी उत्पादन आले. मागच्या वर्षी इजिप्तमध्ये कांदा उत्पादने अतिरिक्त होते, पण भाव पडल्याने त्याचा फटका तेथील शेतकरी व व्यापाऱ्यांना बसला होता. त्याचा परिणाम यंदा कांद्याची लागवड घटण्यात झाला. मात्र तरीही यंदा निर्यातीत दुपटीने वाढ होऊन सप्टेंबर अखेरीस ६०० हजार टनांवर ती गेली. मागच्या वर्षी ३०० हजार टन इतकी कांदा निर्यात होती. कमी उत्पादन आणि वाढलेली निर्यात यामुळे इजिप्तच्या स्थानिक बाजारात कांदा महागला व सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला.

महागाईच्या काळात इजिप्तच्या कांद्याचा दिलासा
आजतागायत भारताच्या कांदा आयातीचा इतिहास पाहता स्थानिक बाजारातील कांदा टंचाई व महागाईच्या काळात इजिप्तसह, तुर्कस्थान, अफगानिस्तानच्या कांद्याने देशाला दिलासा दिल्याचे दिसून येते. त्यातही निवडणुकांच्या काळात लोकांचा रोष वाढू नये म्हणून इजिप्तचा कांदा आयात करण्यात आल्याचे दिसून येते.

नोव्हेंबर २०२०मधील कांदा आयात
नोव्हेंबर २०२०मध्ये केंद्र सरकारने ऐन दिवाळीत तुर्कस्थान, इजिप्त येथून कांदा आयात केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होती. त्यावेळेस स्थानिक कांद्याला सुमारे साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता. तर तुर्कीच्या कांद्याला सरासरी दीड हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता. त्यावर्षी अवकाळी पावसामुळे लाल कांद्याच्या पिकाचे नाशिकसह महाराष्ट्रात मोठे नुकसान झाल्याने कांदा महागला होता.

डिसेंबर २०१९ आणि निवडणूक काळ आणि कांदा आयात
सन २०१९मध्ये डिसेंबर महिन्यात भारतातील किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. सुमारे १२० ते दीडशे रुपये किलोप्रमाणे कांदा विक्री त्यावेळेस होत होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात कांदा टंचाई निर्माण झाल्याने हादरलेल्या केंद्र सरकारने जगभरात मिळेल तेथून कांदा आयात करायला सुरूवात केली होती.  तुर्कस्थान, इजिप्त येथून कांदा आयात करण्यात आली होती. मात्र हा कांदा थंड असल्याने त्याची वाहतुक वातानुकुलित वाहनांमधून करावी लागली होती. इतके करूनही हा कांदा पुणे येथील किरकोळ बाजारात १२० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत होता. 

ऑगस्ट २०१५ 
ऑगस्ट २०१५मध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे भावाने सत्तरी गाठली होती. तेव्हा सत्तेवर येऊन नुकतेच वर्ष झालेल्या केंद्र सरकारने आधी सत्तेवर असलेल्या सरकारचा कित्ता गिरवत इजिप्तवरून कांदा आयात केला. मात्र त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील शेतकऱ्यांना कांद्याचे बाजारभाव कमी मिळाले.

नोव्हेंबर २०१३ इजिप्तचा कांदा आणि निवडणुकांचा काळ
सन २०१३मध्येही नोव्हेंबर महिन्यात कांद्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे इजिप्त, अफगाणिस्तान येथून तत्कालिन केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कांदा आयात केला होता. मात्र इजिप्तचा कांदा आकाराने सुमारे ४०० ग्रॅमचा असल्याने किलोत जास्तीत जास्त तीन कांदे बसतात. त्यामुळे सामान्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्या वर्षी कांदा किरकोळ बाजारात ६० रुपये प्रति किलोपेक्षा जास्त रुपयांनी विकला जात होता. तर इजिप्तचा कांदा सुमारे ५० रुपये प्रति किलोने विकला गेला. त्या वेळी येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्यांमध्ये रोष वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असे बोलले जात होते.

Web Title: Egypt banned onion export for three months will benefited onion prices in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.