पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मसाल्याची राणी समजल्या जाणाऱ्या इलायचीचा (वेलदोडे) गेल्या काही वर्षांत विविध खाद्यपदार्थांमधील वापर वाढल्याने स्थानिक बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणीत वाढ झाली आहे.
यावर्षी इलायचीच्या उत्पादनात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी, एक किलो इलायचीचा दर २१०० ते २५०० हजार रुपयांवर पोहोचला आहे. सणासुदीचा काळात ही दरवाढ कायम असल्याने ऐन दिवाळीत सर्वांत जास्त वापर इलायचीचा केला जात आहे.
इलायचीचा सर्वाधिक वापर मसाल्यासाठी केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत इलायचीचा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापर वाढला आहे.
पूर्वी केवळ मसाल्यासाठी वापरली जाणारी इलायची आता विविध प्रकारच्या खाद्यपदार्थात, पदार्थांसाठी, दुग्धजन्य मुखवास, तेल काढण्यासाठीही वापरली जात आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा इलायचीला मागणी वाढली आहे.
देशात इलायची उत्पादन केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा इलायचीचा मुख्य हंगाम असला तरी सध्या मागील वर्षीचा साठा असल्याने दर स्थिर आहेत.
मात्र यंदा उत्पादनात घट झाल्याने इलायची उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पुढील तीन महिन्यात आणखीन वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
मध्यम इलायची
घाऊक दर - २१०० ते २४००
किरकोळ दर - २४०० ते २७००
गोल्ड नं. १ जाड
घाऊक दर - २५०० ते ३०००
किरकोळ दर - ३२०० ते ३५००
परदेशात भारतीय इलायचीला अधिक मागणी
- आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय इलायचीचा सुगंध अधिक असल्याने या इलायचीलाच मोठी मागणी आहे. त्यामुळे इलायचीची निर्यात आपल्याकडून अधिक होते.
- भारतीय इलायचीच्या स्पर्धेत अमेरिकेतील ग्वाटेमाला इलायची देखील आहे, मात्र आपल्या इलायचीचे गुणधर्म तिच्यात अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे अरब, मध्य पूर्वेकडील देशांत भारतीय इलायचीला मोठी मागणी आहे.
- सध्या दुग्धजन्य पदार्थ जसे श्रीखंड, लस्सी, मिठाई, आईस्क्रीम, फ्लेवर्ड मिल्क यांसह मुखवास आणि इलायचीचे तेल मिळवण्यासाठी हॉटेल उद्योगात इलायचीचा वापर वाढला आहे. त्यामुळे इलायचीच्या मागणीत वाढ झाली आहे.
दिवाळीत पूर्वीपेक्षा यंदा इलायचीला मागणी वाढली आहे. साधारण ३० टक्के माल हा दिवाळीत विक्री होतो. लग्न सराईत १० टक्के मागणी असते. यंदा उत्पादन कमी झाल्याने बाजारात वेलदोडेचा तुडवडा आहे. बाजारात ऑगस्टपासून हंगाम सुरू असून, आणखी तीन महिन्यांनी इलायचीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. - नवीन गोयल, व्यापारी मसाला, ड्रायफुडस