Join us

eNAM : पणन मंडळाचे पुढचे पाऊल! आडत्यांना 'ई-नाम'मध्ये करता येणार ई-पेमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 1:55 PM

पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत ईनाम बाजार समित्यांमध्ये एकूण ४७६ लाख क्विंटल शेतमालाचा ई-लिलाव झाला असून त्याची किंमत १७ हजार ६०७ कोटी आहे.

eNam Market : बाजार समित्यांमध्ये शेतमालांच्या होणाऱ्या ई-लिलावामध्ये आता अधिक पारदर्शकता आणि सुलभता येणार आहे. कृषी पणन मंडळाने केलेल्या विविध मागण्या केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून आता आडत्यांना शेतकऱ्यांचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यामुळे आता ई-लिलाव सुलभ आणि वेगाने होण्यास मदत होणार आहेत.

देश पातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारीत ई-नाम ही योजना केंद्र शासनाने सुरु केली आहे. या योजनेचे कामकाज ई-ट्रेडींग प्लॅटफॉर्म व मोबाईल ऍप द्वारे सुरु आहे. केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत देशातील १३८९ बाजार समित्या ई-नामला जोडल्या आहेत. असुन राज्यातील १३३ बाजार समित्या ई-नामला जोडल्या आहेत. या बाजार समित्यांमध्ये ई-नाम कार्यप्रणालीनुसार कामकाज सुरु आहे.

पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत ईनाम बाजार समित्यांमध्ये एकूण ४७६ लाख क्विंटल शेतमालाचा ई-लिलाव झाला असून त्याची किंमत १७ हजार ६०७ कोटी आहे. ई-लिलावाद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहु, ज्वारी, हळद, तुर, उडीद, कांदा, डाळींब, कोबी, रेशिम कोश या शेतमालाची प्रामुख्याने विक्री करण्यात येते. शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ११८ बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित असून एकूण १६.३८ लाख लॉटस् चे असेईंग करण्यात आले आहे. ई-नामच्या ई-पेमेंट सुविधेद्वारे शेतकऱ्यांना ४४५ कोटी इतकी रक्कम व्यापाऱ्यांनी ऑनलाईन अदा केली आहे.

प्रचलित पद्धतीनुसार राज्यातील बाजार समित्यांमधील आडते शेतमालाच्या विक्रीचे नियोजन करुन शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची रक्कम अदा करतात. ई-नाम कार्यप्रणालीनुसार नोंदणीकृत व्यापारी ई-लिलाव केल्यानंतर ई-नाम संगणक प्रणाली मार्फत ई-पेमेंट करतात. या ई-पेमेंट मध्ये शेतकऱ्यांचे पेमेंट, बाजार समितीची बाजार फी व आडत यांचा समावेश असतो. एकंदरीत ई-नाम मध्ये व्यापारी हा केंद्रबिंदू आहे. प्रचलित पद्धतीनुसार आपल्या राज्यासह इतर राज्यांमध्ये सुद्धा पेमेंट आडत्या मार्फत केले जाते. यामुळे आडत्यांना ई-नाम संगणक प्रणाली मध्ये ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली होती.

या मागणीचा विचार करुन केंद्र शासनाने आडत्यांसाठी वजनाची पावती तयार करणे, सेल ऐंग्रीमेंट व सेल बील तयार करणे, शेतक-यांना ई-पेमेंट करणे, डॅशबोर्ड द्वारे सुरु असलेले ई-लिलाव पाहणे या सुविधांचा नव्याने ई-नाम संगणक प्रणाली मध्ये समावेश करुन कार्यान्वित केल्या आहेत. आडत्यांसाठी ई-नाम मध्ये नव्याने दिलेल्या सुविधांबाबत राज्यातील ई-नाम बाजार समित्यांचे सचिव व आडते यांना ऑनलाईन सभेद्वारे माहिती देण्यात आली आहे.

या व्यतिरीक्त शेतकऱ्यांना बाजार समितीत शेतमाल घेवून जाण्यापुर्वी मोबाईल ऍप द्वारे गेट एन्ट्री करणे बाबत सुविधा दिली असुन या सुविधेद्वारे शेतकरी बाजार समितीत शेतमाल घेवून जाण्यापुर्वी मोबाईल ऍप द्वारे गेट एन्ट्री करु शकतात. या गेट एन्ट्रीचा क्युआर कोड तयार होतो. सदर क्युआर कोड बाजार समितीच्या गेट वर स्कॅन केल्यानंतर त्या शेतमालाबाबतची नोंद (गेट एन्ट्री) ई-नाम संगणक प्रणाली मध्ये होणार आहे. या सुविधेमुळे शेतमाल बाजार समितीत येण्याअगोदर शेतकरी गेट एन्ट्री करणार असल्याने बाजार समित्यांना गेट वर आवकेची नोंद घेण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होवून एन्ट्री गेट वर गर्दी होणार नाही.

केंद्र शासनाने ई-नाम मध्ये आडत्यांसाठी वजनाची पावती तयार करणे, सेल ऍग्रीमेंट व सेल बील तयार करणे, शेतकऱ्यांना ई-पेमेंट करणे, डॅशबोर्ड द्वारे सुरु असलेले ई-लिलाव पाहणे या सुविधा नव्याने सुरु केल्यामुळे ई-नाम अंतर्गत आडत्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने ई-नाम अंतर्गत आडत्यांसाठी नव्याने उपलब्ध केलेल्या सुविधांचा आडत्यांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त व्यवहार ई-नाम अंतर्गत करावेत जेणे करुन शेतकऱ्यास रास्त भाव मिळण्यास मदत होईल असे आव्हान कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.

ई-नाम योजनेतील १९८ बाजार समित्यांची राज्यातील सहास्थीती - सप्टेंबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत

  • ११८ बाजार समित्यांमध्ये ई-ऑक्शन सुरु - एकूण लाख क्विं. ४७६ किंमत रु. १७,६०७/- कोटी.
  • शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ११८ बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित.
  • ११० बाजार समित्यांमध्ये असेईंग सुरु, एकूण १६.३८ लाख लॉटस् चे असेईंग.
  • ७८ बाजार समित्यांमध्ये ई-पेमेंट सुरु एकूण रक्कम रु. ४४५- कोटी.
  • शेतकरी नोंदणी - १२.२९ लाख
  • खरेदीदार (व्यापारी) नोंदणी - २२,३६६
  • आडते नोंदणी - १७,८७४
  • एफ.पी.ओ नोंदणी - ३४१
  • इंटर मंडी ट्रेड- २.६६ लाख क्विंटल, किंमत- रु. १४०.८७ कोटी
  • इंटर स्टेट ट्रेड - १.५० लाख क्विंटल, किंमत रु. ३२.२६ कोटी
  • एफ.पी.ओ. ट्रेड - १२ एफ.पी. ओ., ८९४२ क्विं., किंमत - रु. ४.०९/- कोटी
  • प्रती लॉट बोली लावण्याचे सरासरी प्रमाण ५.५२
  • एकूण ग्राम सभा - १८२८
टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीशेती क्षेत्र