हरी मोकाश
आधारभूत किमतीच्या तुलनेत बाजारपेठेत तुरीला सरासरी ३०० रुपयांचा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रांकडे तूर विक्रीसाठी येतील, अशी अपेक्षा आहे.
परंतु, महिनाभरात एकाही शेतकऱ्याने आपला शेतमाल केंद्रांवर विक्री केला नाही. परिणामी, तूर खरेदीचा उन्हाळाच सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक उत्पादन सोयाबीनचे घेतले जाते. त्यापाठोपाठ तुरीचा ७१ हजार ४७५ हेक्टरवर पेरा झाला होता. गत पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनला फटका बसला.
६९५ शेतकऱ्यांची नोंदणी
नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी जवळपास महिनाभरात जिल्ह्यातील ६९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव आहे. खुल्या बाजारात सध्या सात हजार २५० रुपये भाव मिळत आहे. आधारभूत किमतीपेक्षा जवळपास ३०० रुपये कमी मिळत आहेत.
खुल्या बाजारात काय दर आहेत ?
तारीख | आवक | साधारण दर |
१३ मार्च | ३५५३ | ७२५० |
१२ मार्च | ४५८८ | ७२०० |
१० मार्च | ६०२५ | ७३०० |
८ मार्च | ३७१५ | ७२५० |
७ मार्च | २६८२ | ७२५० |
६ मार्च | २४०७ | ७४०० |
४ मार्च | ३८७३ | ७४०० |
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद दिसत नाही. एक महिन्यापासून १९ केंद्रे सुरू आहेत. परंतु, एकाही शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी झाला नाही. - विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाफेड, लातूर.
तूर दरात घसरण
नोव्हेंबर अखेरपासून राशींना सुरुवात झाली. तेव्हा बाजारपेठेत दरही अधिक होते. मात्र, नवीन तूर बाजारपेठेत आल्यानंतर भावात मोठी घसरण झाली. दरम्यान, शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीच्या नोंदणीस आणि प्रत्यक्ष खरेदीस १४ फेब्रुवारीपासून सुरुवात केली. महिना उलटला तरी अद्यापही एकाही शेतकऱ्याची तूर खरेदी नाही.