कल्याण: सध्या फास्टफूडचा जमाना असून दिवाळी सणात तयार फराळाची मागणी वाढली असतानाही शहरातील बाजारपेठेत आलेल्या विक्रेत्यांकडील कंदमुळे खरेदीसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे.
ही कंदमुळे वर्षभर टिकत असल्याने मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये पाडव्याच्या दिवशी उकडलेली रताळी, करांदे, कोणी, चवळी, भुईमुगाच्या शेंगा या कंदमुळांसोबत गुळ टाकून तांदळाच्या पिठातील चामट्या बनवल्या जातात.
हे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जाण्याची परंपरा आहे. आजही घरातल्या लहानथोरांना मीठ टाकून उकडलेली कंदमुळे दिली जातात. सकाळच्या वेळेत हे तेलविरहित पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने दिवाळी सणांमध्ये होणारे अपचन वा इतर विकार दूर होतात.
या कंदमुळांमध्ये चौथ्याचे व तंतूचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया सुलभ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पश्चिमेकडील शंकरराव चौक परिसरात आणि कुंभारवाडा येथे ही कंदमुळे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. शहापूर, मुरबाड आदी भागातून आणलेली कंदमुळे घेऊन विक्रेते शहरात आले आहेत.
कंदमुळांचे दर (किलोमध्ये)रताळी - १००कोणी - १२०अरबी - १२०चवळी - २००शेंगा - १६०करांदे - २००
रताळीमध्ये उच्च प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी ५, बी ६, थायमिन, नायसिन, रिबोफलाविन व उच्च प्रमाणात कॅरोटेनॉइड्स असतात. हे घटक कॅन्सर प्रतिबंधक असून दृष्टी ही सतेज राहते. तसेच रक्तवाहिन्या व धमन्यांमधील लवचिकता ठेवते. कंदमुळामध्ये हेल्दी फॅट्स आहेत. त्यामुळे हे नैसर्गिक पदार्थ अधिकआरोग्यदायी असतात. - सुमैया ए. आहारतज्ज्ञ
तांदळाच्या पिठात गुळ, वेलची टाकून तेलात बनवलेल्या चामट्या आणि सोबत मीठ टाकून शिजवलेल्या कंदमुळांचा नैवेद्य पाडव्याच्या दिवशी दाखवला जातो. ही कंदमुळे आरोग्यासाठी लाभदायक असून वर्षभर टिकतात. - संतोष पाटील, विक्रेते